शरद पवार यांच्या फडणवीसांवरील स्तुतीसुमनांनतर राजकीय वर्तृळात चर्चांना उधाण

पवार पिता पुत्रीच्या मनात नेमके काय सुरू आहे यावर आता राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लढवले जात आहेत.

महाराष्ट्रात राज्यसभेच्या ६ जागांपैकी ३ जागांवर भाजपला विजय मिळाला आहे. या विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार ( sharad pawar) यांनी या निकालावर आपल्याला जराही आश्चर्य वाटलं नसल्याचे म्हटले आहे. तर पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनीदेखील भाजपला शुभेच्छा दिल्या. तसेच आपल्याला हा  पराभव स्वीकारायला हवा असे म्हटले आहे. यामुळे पवार पिता पुत्रीच्या मनात नेमके काय सुरू आहे यावर आता राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लढवले जात आहेत.

शुक्रवारी पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री पियुष गोयल, राज्याचे माजी मंत्री अनिल बोंडे आणि माजी खासदार धनंजय महाडिक विजयी झाले आहेत. तर शिवसेनेचे नेते संजय राऊत , राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे इमरान प्रतापगढी हे देखील राज्यसभेच्या निवडणुकीत जिंकले आहेत. मात्र शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांना भाजपचे धनंजय महाडिक यांनी पराभूत केले आहे. अत्यंत अटीतटी आणि चुरशीच्या झालेल्या या निवडणूकीत अनेक नाट्यमय घटनाही घडल्या. यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप -प्रत्यारोपाच्या फैरीही झडल्या. निवडणुक आयोगाने मतमोजणी रोखली यामुळे निकालही विलंबाने लागला. यामुळे मविआ आणि भाजपमध्ये द्वंदयुद्ध झाले. अखेर ६ पैकी ३ जागांवर विजय मिळवत भाजपने मविआला जोर का धक्का दिला. यावरून संजय राऊतांसह मविआतील अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त करत भाजपला लक्ष्य केलं.

पण हे सगळे बघून पवार यांनी आपल्याला जराही आश्चर्य झालं नसल्याचे सांगितले. तसेच त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे  गुणगाणच केले. अपक्ष उमेदवारांचे मत मिळवण्यात भाजपला यश मिळाले असेही ते म्हणाले. तर शिवसेनेचे संजय राऊत यांनी मात्र आगपाखड करत निवडणूक आयोग आणि भाजप यांच्यात साटेलोटे असल्याचाचं आरोप केला.
काँग्रेसचे नाना पटोले यांनीही यावर आक्रमक भूमिका घेत आम्ही फडणवीस यांच्या गेम प्लानमध्ये फसल्याचं सांगत थेट भाजपवर निशाणा साधला.

तर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपला शुभेच्छा दिल्या. तसेच हा पराभव स्विकारायला हवा असेही सांगितले. यामुळे महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांच्या जिव्हारी जेवढा हा पराभव लागला तेवढा तो पवार आणि सुप्रियांना का लागला नाही. त्यांनी तो इतक्या सहजपणे कसा स्विकारला यावर आता मविआ सरकारमधील नेते मंडळींची खलबंत सुरू झाली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पवार हे ज्येष्ठ अनुभवी खेळाडू असून त्यांना चाणक्यही म्हटले जाते. यामुळे भाजपच्या खेळीची त्यांना आधीच कल्पना होती का आणि जर त्यांना हे माहित होते तर मग त्यांनी सरकारमधील इतर दोन पक्षांना आधीच सावध का केले नाही असा सवाल आता मविआचे नेते करत आहेत.

दरम्यान, ऐन निवडणुकीच्या धामधुमीत देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली होती. ते घरातच क्वारनटाईन झाले. पण त्यानंतरही फडणवीस भाजपच्या नेतेमंडळींबरोबर व्हिडीओ कॉनफरन्सिंगद्वारे संपर्कात होते. याचाच फायदा राज्यसभेत भाजपला झाला आहे.