घरमहाराष्ट्ररक्ताचे नाते जपणारा रक्तदाता

रक्ताचे नाते जपणारा रक्तदाता

Subscribe

पुण्यातील ६२ वर्षीय राम बांगड गेल्या ४० वर्षांपासून रक्तदान करत आहेत. येत्या २ सप्टेंबरला ते १२५ वं रक्तदान करणार आहेत. तरुणांनी जास्तीत जास्त पुढाकार घेऊन रक्तदान करावे असे आवाहन राम बांगड यांनी केले आहे.

रक्तदान हेच श्रेष्ठदान… या वृत्तीने अनेक जण रक्तदान करत असतात. काहीजण रक्तापलीकडे जाऊन रक्ताची नाती जपतात. त्यापैकीच एक पुण्यातील ६२ वर्षीय राम बांगड. जे गेल्या ४० वर्षांपासून रक्तदान करत आहेत. पण, आता त्यांचं पुढचं टार्गेट आहे १२५ वेळा रक्तदानाचं. ते येत्या २ सप्टेंबरला १२५ वं रक्तदान करणार आहेत.

कशी झाली रक्तदानाची सुरूवात

एकदा अचानक राम बांगड यांच्या राहत्या वस्तीच्या मागे असलेल्या इमारतीचा एक भाग कोसळला. त्यात एक चौदा वर्षाची मुलगी गंभीर जखमी झाली. तिला पुण्यातील ससून रुग्णालयात नेण्यात आले. तेव्हा तातडीने तिला रक्त देण्याची आवश्यकता होती. त्या दृष्टीने तिथे धावपळ सुरु झाली आणि रक्तदानाची गरज लक्षात आली. त्यांनी तिथे स्वतः रक्तदान केले. त्याचसोबत रक्तदान करण्यासाठी तरुणांना प्रवृत्त करण्याचा ठाम निश्चयही केला. १९७६ साली त्यांनी पहिल्यांदा रक्तदान केलं. त्यातूनच त्यांनी ‘रक्ताचे नाते ट्रस्ट’ची स्थापना करून, त्याद्वारे भारतातील २० राज्य जोडण्यात आले आहेत. त्यात ४० हजार रक्तदाते आहेत. दिल्ली, पंजाब, हैदराबाद, गुजरात, राजस्थान , ओडिसा या आणि अशा अनेक जिल्ह्यातील रक्तदाते जोडले गेले आहेत.

” रक्तदानाचं काम आमच्याकडे २४ तास सुरू असते. एखादा रुग्ण जर रुग्णालयात दाखल असेल तर आम्ही त्यांची सर्वतोपरी काळजी घेतो. थॅलेसेमिया, कॅन्सर, शस्त्रक्रिया अशा अनेक गोष्टींसाठी रक्ताची खूप जास्त गरज भासते. त्यामुळे जास्तीत जास्त रक्तदान होणे गरजेचे आहे. रुग्णालयांच्या स्पर्धेमध्ये गरीबांचे वाईट हाल होत आहेत. त्यामुळे शासनाने गरीबांना भूर्दंड लागणार नाही याची काळजी घ्यावी. रक्ताच्या पिशव्यांची किंमत आणखी कमी करावी जी सर्वसामान्यांना परवडू शकेल.” – राम बांगड, रक्तदाता

- Advertisement -

२ सप्टेंबरला होणार भारतातील पहिलं भव्य रक्तदान

रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्टतर्फे रक्तदाते ‘राम बांगड’ यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी रक्तदानानिमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये देशातील १२ राज्यांतील रक्तदाते पुण्यात येऊन रक्तदान करणार आहेत. रविवारी २ सप्टेंबरला हे रक्तदान शिबीर भरवण्यात येणार आहे. यावेळी विविध राज्यातील रक्तदात्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच पुण्यातील सामाजिक संस्था आणि मंडळाचा सहभाग असणार आहे. त्याचबरोबर पुण्यातील १४ ब्लड बँक आणि ससून रक्तपेढीला रक्ताच्या पिशव्या देण्यात येणार आहेत. या शिबिरात ‘ऍनिमिया मुक्त महाराष्ट’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याचबरोबर देहदान, अवयवदान, नेत्रदान याविषयी जनजागृती करण्यात येणार आहे.

१२५ महिलाही करणार रक्तदान

२ सप्टेंबरला या भव्य रक्तदान शिबीरामध्ये १२५ महिला रक्तदान करणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी पुढाकार घेऊन रक्तदान करावं, असं आवाहन राम बांगड यांनी ‘आपलं महानगर’ शी बोलताना केलं आहे. गरजू रुग्णांना सवलतीच्या दरामध्ये रक्त पूरवठा केला जातो. महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपऱ्यातून इमर्जन्सी कॉल आला की, राम बांगड यांच्याकडील रक्तदाता त्याठिकाणी दाखल होतात. आतापर्यंत ५० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे.

- Advertisement -

तरुणांनी जास्तीत जास्त पुढाकार घ्यावा

समाजकार्य करण्याचा रक्तदान हा सर्वात सोपा मार्ग आहे. त्यामुळे तरुणांनी जास्तीत जास्त पुढाकार घेऊन रक्तदान केलं पाहिजे, असं आवाहन राम बांगड करतात.

Bhagyshree Bhuwadhttps://www.mymahanagar.com/author/bhagu/
भटकंती करायला खूप आवडतं. कोषात बसून राहणं अजिबात आवडत नाही. वडापाव प्रचंड आवडतो. जेवण तयार करण्याची आवड आहे. भरतनाट्यम शिकतेय. जीवनावर मनापासून प्रेम करते. नकार हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -