मुंबई : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे मतदान बुधवारी (20 नोव्हेंबर) पार पडले. यावेळी राज्यात अनेक घटना पाहायला मिळाल्या. राज्यात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची धामधुम सुरू असताना मुंबईत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या भावना दुखावल्या गेल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांच्याशी बांद्रा येथील मतदान केंद्रात दुजाभाव झाल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. (Ramdas Athawale RPI discrimination at polling station in bandra east)
हेही वाचा : Maharashtra Exit Poll : महायुती की महाविकास आघाडी, कोण येणार सत्तेत? ‘चाणक्य’चा मोठा एक्झिट पोल समोर
केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे बुधवारी दुपारी वांद्रे पूर्व येथील गांधीनगर परिसरातील नवजीवन विद्या मंदिर येथील मतदान केंद्रांवर गेले होते. यावेळी मतदान केंद्रात मतदान करताना अनेक उमेदवार आणि नेत्यांचे फोटो काढण्यात आले. पण, रामदास आठवले हे मतदान करताना त्यांच्यासोबत एकाही फोटोग्राफरला आतमध्ये सोडण्यात आले नाही. निवडणूक आयोगाने अधिकृत परवानगी दिलेला ओळखपत्र पास असणाऱ्या एका फोटोग्राफरला आत सोडावे, अशी वारंवार विनंती केल्यानंतरही पोलिसांनी एकाही फोटोग्राफर ला आत सोडण्यास मनाई केली. हा रिपब्लिकन पक्षाशी दुजाभाव झाल्याची भावना आठवलेंच्या समर्थकांमध्ये पसरली.
सदर प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली असून रामदास आठवले यांच्या कार्यालयाने वांद्रे विधानसभा मतदारसंघ नवजीवन विद्यामंदिर मतदान केंद्रावरील तैनात पोलिसांची निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग याबाबत काही कारवाई करणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान, यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासोबत पत्नी सीमा आठवले, मुलगा जीत आठवले यांनीदेखील मतदानाचा हक्क बजावला.