सरकारच राज्यात बंद कसा पुकारू शकते?; आठवलेंचा महाविकास आघाडीला सवाल

महाराष्ट्र बंद पुकारण्याची महाविकास आघाडीची भूमिका चुकीची - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

Ramdas Athawale

महाविकास आघाडी विरोधाला विरोध करण्याच्या राजकारणात इतके मश्गुल आहे की त्यांना भान राहिलेले नाही के ते राज्यात सरकार चालवीत आहेत. राज्य सरकार स्वत:च राज्यात बंद कसा पुकारू शकतात? सरकारने बंद पुकारने ही महाविकास आघाडीची चुकीची भूमिका आहे. त्याचा त्यांनी पुनर्विचार करावा, असं रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. उद्या ११ ऑक्टोबर रोजी महाविकास आघाडीतर्फे महाराष्ट्र् बंद पुकारण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर ना रामदास आठवले यांनी राज्यात सरकार चालविणारे महाराष्ट्र बंद कसा पुकारू शकतात असा सवाल केला आहे.

लखीमपूर खेरी मधील हिंसाचाराचा रिपब्लिकन पक्षाने तीव्र निषेध केला आहे. लखीमपूर खेरी तील प्रकार निषेधार्ह दुःखद आणि मनाला चटका लावणारा आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांनी एसआयटी मार्फत चौकशी सुरू केली असून या प्रकरणी कोणीही दोषी असो त्यावर कठोर कारवाई निश्चित होईल. केंद्र सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. शेतकऱ्यांचे नेते नवीन कृषी कायद्यांबबत चुकीच्या पद्धतीने आंदोलन करीत आहेत, असं आठवले म्हणाले.

केंद्र सरकार नवीन कृषी कायद्यांमध्ये शेतकऱ्यांना हवे ते बदल करण्यास तयार आहेत. मात्र कायदेच रद्द करा आधी अशी आडमुठी भूमिका शेतकरी नेत्यांनी घेतली आहे. सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी कायद्यांबाबत सूचनांचे स्वागत करून कायद्यात सुधारणा करण्यास तयार आहे. त्यामुळे लोकशाहीत सर्वच प्रश्न आंदोलन करून सोडवताना काही प्रश्न चर्चा करून ही सोडविले पाहिजेत. लोकशाहित आंदोलन करणे योग्य मात्र शेतकरी नेते ज्या पद्धतीने आंदोलन करीत आहेत तो आंदोलनाचा अतिरेक आहे असे ना रामदास आठवले म्हणाले.

उद्या सोमवारी महाराष्ट्र् राज्य सरकार च्या सत्तारूढ पक्षांनीच महाराष्ट्र बंद ची हाक देणे चूक आहे असे रामदास आठवले म्हणाले.