रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची शिवसेनेतून हकालपट्टी

शिवसेनेतून शिंदे गटात सहभागी झालेल्या रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. रामदास कदम यांचा आमदार मुलगा यापूर्वीच शिंदे गटात सहभागी झाला होता. याशिवाय रामदास कदम यांनी पक्ष विरोधात भूमिका घेतल्याचे कारण पुढे कर पक्षाने ही कारवाई केली.

रामदास कदम काही दिवसांपासून नाराज –

रामदास कदम यांची ओळख एक कट्टर शिवसैनिक अशी होती. बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना शिवसेनेचे नेतेपद दिले होते. मात्र, शिवसेनेची सत्ता असताना ही ते पक्षापासून दुरावले होते. यावेळी अनिल परब आणि त्यांच्यातील अंतर्गत वादही चव्हाट्यावर आला होता. यानंतर आपण पक्ष सोडनार नाही अशी भूमिका त्यांनी मध्यंतरी घेतली होती. मात्र, त्यांनी पक्षाविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत त्यांना अखेर पक्षातून काढण्यात आले आहे. याबाबत अधिकृत घोषणा शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

नेते पदाचा राजीनामा –

शिवसेनेमध्ये पूर्वीसारखे वातावरण राहिले नाही. ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना नाहीतर अनेकांचा पक्षामध्ये हस्तक्षेप वाढत आहे. त्यामुळे आपण शिवसेना नेते पदाचा राजीनामा देत असल्याचे सांगत रामदास कदामांनी स्पष्ट केले आहे. शिवाय महाविकास आघाडी बरोबर जाऊ नका असेही आपण शिवसेना पक्षप्रमुखांना अनेक वेळा सांगितले होते असेही कदम म्हणाले.