रामदास कदमांकडून उद्धव ठाकरेंची अफजल खानशी तुलना, म्हणाले…

uddhav thackeray

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्या(रविवार) खेड येथील गोळीबार मैदानात जाहीर सभा होणार आहे. यासाठी शिवसैनिकांकडून या सभेची जोरदार तयारी सुरू आहे. यावेळी शिंदे गटाचे नेते आणि आमदार योगेश कदम यांनी खेडमध्ये बॅनरबाजी केली असून विरोधकांना एक इशारा दिला आहे. दरम्यान, शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची तुलना अफलज खानशी केली आहे.

रामदास कदमांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, अफजल खान जसा लाखो सैन्य घेऊन महाराष्ट्रावर चाल करून आला होता, अगदी तसेच उद्धव ठाकरे संपूर्ण महाराष्ट्रातून लोक घेऊन खेडच्या सभेला आले होते, अशी टीका रामदास कदम यांनी ठाकरेंवर केली.

उद्धव ठाकरे यांनी आम्हाला संपविण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. मला गुहागर येथे उद्धव ठाकरे यांनीच पाडले. मी तिथे गाफील राहिलो असे म्हणत रामदास कदम यांनी ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्याविरोधात दंड थोपटले. आमदार योगेश कदमचे तिकीट कापण्यासाठी प्रयत्न झाले पण ते माझ्यापुढे यशस्वी झाले नाही. पण आता २०२४ला भास्कर जाधवांना आम्ही त्यांची जागा दाखवून देऊ, असा इशारा रामदास कदम यांनी भास्कर जाधवांना दिला.

१९ मार्चला होणारी सभा ही फक्त कोकणवासीयांची असेल आणि तुम्हाला समजेल कोकणी जनता ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रामदास कदम यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी उठाव केला नसता तर आम्ही राजकारणातून संपलो असतो. त्यामुळे उद्याची सभा ऐतिहासिक ठरेल, असं म्हणत कदमांनी ठाकरेंवर निशाणा साधला.


हेही वाचा : विरोधकांच्या पोटात नुसती आग म्हणून.., बॅनरबाजीतून रामदास कदमांचा इशारा