घरताज्या घडामोडीDasara Melava 2021 : रामदास कदम यांचे अनिल परबांविरोधात मुख्यमंत्र्यांना पत्र

Dasara Melava 2021 : रामदास कदम यांचे अनिल परबांविरोधात मुख्यमंत्र्यांना पत्र

Subscribe

राज्याचे माजी पर्यावरण मंत्री, शिवसेना नेते रामदास कदम आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यातील वाद शमण्याची चिन्हे दिसत नाहीत. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आगामी निवडणुकांचे रणशिंग फुंकण्याच्या तयारीत असतानाच रामदास कदम यांनी अनिल परब यांच्या विरोधात पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खरमरीत पत्र लिहून तक्रार केली आहे. त्यामुळे रामदास कदम यांनी उघडपणे पत्राच्या माध्यमातून घेतलेल्या नडमनडी नंतर ‘मातोश्री’ आपल्या न्यायाचं दान रामदास कदम यांच्या पारड्यात टाकणार की अनिल परब यांना झुकतं माप देणार याकडे अवघ्या शिवसेनेचं लक्ष लागलेलं आहे.

शिवसेनेत नाराजी 

रत्नागिरीतील दापोली येथील समुद्र किनाऱ्यावर असलेल्या अनधिकृत रिसॉर्टच्या बाबतीत भाजपचे माजी खासदार आणि शिवसेनेचे विरोधक किरीट सोमय्या यांना अनिल परब यांच्या बेनामी, अवैध, आलिशान मालमत्तेबाबत इत्यंभूत माहिती शिवसेना नेते रामदास कदम यांनी दिल्याचा ऑडिओ पुरावा समोर आला होता. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार धमाका झाला होता कारण याच अनिल परब यांनी तुरुंगात असलेल्या सचिन वाझेला १०० कोटी खंडणी वसूलीचं काम दिल्याचा जवाब वाझेने सीबीआयला दिला आहे. कोकणातील आरटीआय कार्यकर्त्यांच्या माध्यमातून रामदास कदम यांनी ही सगळी माहिती किरीट सोमय्या यांच्यापर्यंत पोचवण्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर रामदास कदम यांच्या बद्दल शिवसेनेमध्ये कमालीची नाराजी आहे. याच पार्श्वभूमीवर माटुंग्याच्या षण्मुखानंद सभागृहात होणाऱ्या दसरा मेळाव्याला रामदास कदम उपस्थित राहणार की नाही याबद्दल मतमतांतरं सुरू आहेत.

- Advertisement -

तीन पानी पत्रातून मांडली कैफियत

या ऑडिओ क्लिप नंतर मातोश्रीनेही रामदास कदम यांच्या बाबत जरी थेट कोणती कारवाई केली नसली तरी रामदास कदम यांनीच परिवहन मंत्री आणि ‘मातोश्री’चा चाणक्य समजले जाणारे शिवसेनेतील तिसऱ्या क्रमांकाचे नेते अनिल परब यांच्याविरोधात तीन पानी पत्र लिहून पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपली कैफियत मांडलेली आहे. या पत्रातील मजकूर रामदास कदम यांच्या स्वभावाला आणि शैलीला साजेशा स्वरूपात मांडण्यात आला असला, तरी त्यातून अनिल परब यांनी शिवसेनेतली बहुतांश सूत्रं आपल्या हाती कशाप्रकारे ठेवलेली आहेत, त्यातून ज्येष्ठ शिवसैनिक, तसेच हाजी हाजी करणाऱ्या समर्थकांसाठी चांगल्या तरुण कार्यकर्त्यांवर कशा स्वरूपात अन्याय करत आहेत त्याचा पाढा वाचण्यात आलेला आहे. या ऑडिओ क्लिप च्या बाबतीत आपल्यावरील आरोपाचं स्पष्टीकरणही रामदास कदम यांनी या पत्रात दिल्याचं विश्वसनीय वृत्त आहे.

चाणक्याविरोधातच ठोकला शड्डू

२००५ साली नारायण राणेंची पक्षाबाहेर हकालपट्टी केल्यानंतर राणेंच्या संपर्कात असलेल्या रामदास कदम यांना शिवसेनेनं विरोधी पक्ष नेता केल्यावर त्यांनी नाईलाजाने का होईना राणेँविरुद्ध भूमिका घेत निकराची लढत दिली होती. ही गोष्ट जरी खरी असली तरी नारायण राणे यांच्या विरोधात जाहीर भूमिका घेतल्यामुळे रामदास कदम यांना त्यांच्या क्षमतेपेक्षा अधिक मानमरातब ‘मातोश्री’ दिल्याचं शिवसेना नेत्यांमध्ये बोललं जात आहे. आता तेच रामदास कदम पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्ती आणि चाणक्य समजल्या जाणाऱ्या अॅड.अनिल परब यांच्या विरोधात शड्डू ठोकून मैदानात उतरलेले आहेत. कदम यांनी टाकलेला लेटर बाॅंम्ब अनिल परब यांची एकाधिकारशाही मोडीत काढणार की कदम स्वतःसह आपला आमदार पुत्र योगेश कदम याच्या राजकीय वाटेतला बाभळीचा काटा ठरणार याबद्दल शिवसैनिकांमध्ये चर्चांना ऊत आलेला आहे.

- Advertisement -

भाजप कनेक्शन 

गेल्या काही दिवसांपासून रामदास कदम हे भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्या संपर्कात आहेत भाजपच्या काही नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार आगामी लोकसभा निवडणुकीत रामदास कदम हे भाजपचे रायगडमधील उमेदवार असले तर आश्चर्य वाटू नये अशी रणनीती आखली जात आहे.

अनिल परबांबाबत नाराजीचा सूर 

अनिल परब हे वांद्रे विधानसभा मतदारसंघ ते अगदी थेट संसदेपर्यंतच्या घडामोडींवर ‘मातोश्री’ ला कायदेशीर आणि राजकीय सल्ला देत असतात. उध्दव ठाकरे मुख्यमंत्री पदावरील कामात व्यस्त असल्याने सध्या लहान मोठ्या सगळ्याच नेत्यांना अनिल परब यांना रिपोर्टिंग करावे लागत आहे. त्यामुळे परब यांच्या विरोधात मुंबई महानगरपालिकेतील नेत्यांसह दिल्लीतील शिवसेनेचे बडे नेतेही कमालीचे नाराज आहेत. मात्र मातोश्रीची पूर्ण मर्जी संपादन केलेले अनिल परब हे आदित्य ठाकरे यांच्या नंतरचे तिसऱ्या क्रमांकाचे शक्तिशाली नेते म्हणून गेल्या काही महिन्यांमध्ये उदयाला आलेले आहेत. इतक्या शक्तिशाली नेत्या वरच रामदास कदम यांनी लेटर बॉम्ब टाकल्याने त्यांच्या बाबतच्या नाराजीत आणखी भर पडेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या पत्रावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अद्याप कोणताही निर्णय घेतला गेला नसला तरी पक्षप्रमुख कोणाच्या बाजूने कौल देते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

गितेंचाही नाराजीचा सूर 

रामदास कदम यांच्या आधी अनंत गीते यांनी सरकार विरोधी आणि शरद पवार विरोधी सूर काढला होता मात्र त्यांचा थेट निशाना हा पक्षप्रमुख किंवा मातोश्रीवर नव्हता. तसेच अनंत गीते हे संघटनेसाठी सध्या फारसे आता उपयुक्त नसले तरी ते ज्या कुणबी समाजातून येतात तो समाज मोठ्या प्रमाणात कोकणात आहे. अनंत गीते यांच्यासारख्या निरूपद्रवी नेत्याला पक्षाबाहेर ची वाट दाखवल्यास हा समाज नाराज होऊन आगामी राजकीय समीकरणं बिघडू शकतात. त्यामुळे अनंत गिते यांना दुर्लक्षित करण्याची रणनीती बनवलेल्या मातोश्रीवर अनिल परब यांच्या विरोधातल्या लेटर बॉम्बने पक्षांतर्गत घडामोडींचा विचार करण्यास भाग पाडलेलं आहे.

लेटर बॉम्बचे काय पडसाद ?

दिल्लीतील एका वजनदार सेना नेत्याने या पत्रा बाबतच्या वृत्ताला दुजोरा दिलेला आहे तर दुसऱ्या बाजूला २२ डिसेंबर २०२१ ला रामदास कदम यांची मुंबई महानगरपालिकेतून विधान परिषदेवर जाण्याची मुदत पूर्ण होत आहे. या दरम्यान शिवसेना त्यांना पुन्हा संधी देणार की परब यांच्या विरोधात शड्डू ठोकून थेट मातोश्री लाच आव्हान देणाऱ्या त्यांच्या भूमिकेला कारवाईतून अद्दल घडवणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेलं आहे. रामदास कदम यांनी परब यांच्या विरोधातली व्हिडिओ क्लिप व्हायरल केल्यानंतर पुन्हा त्याच ताकतीने टाकलेला ‘लेटर बॉम्ब’ हा तरी अनिल परब यांची पक्षातील एकाधिकारशाही आणि ‘हम करे सो कायदा’ ही वृत्ती थांबवण्यास फायदेशीर ठरणार की नाही याकडे शिवसेनेच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांचे लक्ष लागलेलं आहे.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -