मला आणि योगेशला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न केला; रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर आरोप

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज खेडच्या गोळीबार मैदानावर सभा घेणार आहेत. खेड हा शिवसेनेचे (शिंदे गट) रामदास कदम यांचा बालेकिल्ला मानला जातो. पण याचठिकाणी उद्धव ठाकरे सभा घेणार असल्याने सध्या खेडमध्ये दोन्ही पक्षांकडून जोरदार पोस्टरबाजी देखील करण्यात आली आहे.

Ramdas Kadaman's charges against Uddhav Thackeray

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच जाहीर सभा घेणार आहेत. खेड येथे या सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. परंतु खेड हा मतदारसंघ शिवसेनेचे (शिंदे गट) रामदास कदम यांचा बालेकिल्ला मानला जातो आणि याच ठिकाणी ठाकरेंची तोफ कडाडणार आहे. पण त्याआधी रामदास कदम यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे यांनी मला आणि योगेशला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.

यावेळी रामदास कदम म्हणाले की, खेड हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता, आजही आहे आणि उद्याही असेल. तसूभर देखील त्याच्यामध्ये काही फरक पडणार नाही. उद्धव ठाकरे येत आहेत म्हणून मुंबईत, ठाणे, पुणे, नवी मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातून लोक आणण्याची प्रचंड तयारी सुरु आहे. जणू काही शिवाजी पार्कवरील दसऱ्याची जाहीर सभा आहे. रामदास कदमचा किती मोठा धसका घेतला आहे, हे यावरून स्पष्ट होत आहे.

बाहेरची लोक आणून याठिकाणी राजकारण होणार नाही. लोक येथील भाषण ऐकतील आणि निघून जातील पण स्थानिक नेते अंडी लोक किती आहेत? दोन,चार टक्के पण नाही. त्यामुळे मला काळजी करण्याची गरज नाही. यावे, बोलवे आणि जावे याची मी नोंद घेत नाही, अशी टीका कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

पुढे ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंच्या या सभेचे उत्तर देण्यासाठी खेडच्याच गोळीबार मैदानावर सभा घेण्यात येईल. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील, शंभूराज देसाई, शिवसेनेचे गटनेते आणि महाडचे आमदार भरत गोगावलेंसह शिवसेनेचे इतर मंत्री देखील उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती रामदास कदम यांच्याकडून देण्यात अली. तर त्याचठिकाणी व्याजासह सगळी उत्तरे देण्यात येतील, असा इशारा देखील त्यांनी दिला.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी मला कोणते तरी खाते द्यायचे म्हणून पर्यावरण खाते देऊन एका बाजूला केले. याआधी वन आणि पर्यावरण असे खाते होते, पण यामधून पर्यावरण खाते वेगळे करण्यात आले, अशी माहिती त्यांच्याकडून यावेळी देण्यात आली तर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी निधी दिला नाही. उलट आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ५० कोटी म्हणजेच ठाकरेंच्या भाषेतील ५० खोके इतके विकास कामांसाठी दिले आहेत. त्यामुळे आता नीट विकासकामे सुरु आहेत.

हेही वाचा – भाजपमध्ये राहा नाही तर कुठेही राहा, कारवाई होणारच..; फडणवीसांचा सूचक इशारा

रामदास कदम यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप देखील केले आहेत. उद्धव ठाकरेंसारखा पहिला नेता असेल ज्यांनी आपल्याच पक्षातील आमदारांना संपवले आणि दुसऱ्याचे भाड्याने घेतले. हे शिवसेना प्रमुखांनी कधी केले नव्हते. या ठिकाणी मुद्दाम अनिल परब यांना पाठवून आम्हाला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा जर का बदल झाला नसता तर कदाचित आम्ही राजकारणातून संपविण्यात उद्धव ठाकरे यशस्वी झाले असते. उद्धव ठाकरे यांनी फक्त रामदास कदम यांनाच नाही तर त्यांच्या मुलाला देखील बाहेरची माणसे आणून संपवण्याचा प्रयत्न झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, उद्धव ठाकरे जितक्या वेळा खेडमध्ये येतील त्याने काहीही फरक पडणार नाही. उलट त्यांच्या येण्याने आमच्या मतांमध्ये वाढ होईल, असा विश्वास यावेळी रामदास कदम यांनी व्यक्त केला.