घरमहाराष्ट्ररमेश कदमांना हायकोर्टाकडून जामीन, पण सुटका नाही

रमेश कदमांना हायकोर्टाकडून जामीन, पण सुटका नाही

Subscribe

मुंबईः लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले माजी आमदार रमेश कदम यांना मुंबई उच्च न्यायालयाने १ लाख रुपयांचा सशर्त जामीन मंजूर केला आहे. तब्बल आठ वर्षांनी माजी आमदार रमेश कदम यांना जामीन मंजूर झाला आहे. मात्र अन्य प्रकरणातही कदम हे अटकेत आहेत. त्यामुळे जामीन मंजूर होऊनही कदम यांची सुटका होऊ शकणार नाही.

कदम यांनी तपासात सहकार्य करावे. मुंबई व ठाणे सोडून जाऊ नये, अशा अटी न्यायालयाने कदम यांना घातल्या आहेत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष असताना कदम यांनी शेकडो रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. मात्र २५० कोटींचा हा गैरव्यवहार झाला असून त्याचे ३७०० पानी पुरावे आपण लाचलुचपतसह सर्व विभागांना दिले आहेत, असा दावा नंतर करण्यात आला. माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी रमेश कदम यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. याप्रकरणी २०१५ मध्ये रमेश कदम यांना अटक करण्यात आली. अटक केल्यानंतर रमेश कदम यांना आर्थरोड कारागृहात ठेवले होते. नंतर त्यांना भायखळा कारागृहात ठेवण्यात आले. याच काळात रमेश कदम यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून निलंबित करण्यात आले.

- Advertisement -

रमेश कदम यांनी जामीनासाठीही अर्ज केला होता. २०१८ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. कारागृहातील असभ्य वर्तन व साक्षीदारांची सुरक्षा असे कारण देत न्यायालयाने रमेश कदम यांना जामीन नाकारला होता. त्यानंतरही रमेश कदमही नेहमीच वादाच्या भोवऱ्यात व चर्चेत राहिले. मध्यंतरी रमेश कदम यांचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत रमेश कदम हे आर्थरोड कारागृहातील पोलिसांना शिवीगाळ करताना दिसत होते. मात्र पोलीसच आपल्याला जातीवाचक शिवीगाळ करत होते. त्यांनी २५ हजार रुपयांची लाच मागितली, असा दावा रमेश कदम यांनी केला. गेल्या वर्षी रमेश कदम यांना याप्रकरणातून दोष मुक्त करण्यात आले. भायखळा कारागृहात असतानाही वॉर्डन मंजुळा शेट्ये हत्या प्रकरणातही प्रकरणातही रमेश कदम यांनी पोलिसांवर आरोप केले होते.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -