मुंबई : भायखळा येथील राणीची बाग (वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय) दर आठवड्यातील बुधवारी आपल्या साप्ताहिक सुटीसाठी बंद ठेवण्यात येते, मात्र 25 डिसेंबर रोजी बुधवार असून नाताळ (ख्रिसमस) सणानिमित्त या दिवशी सरकारी सुटी आहे. त्यामुळे महापालिकेने राणीची बाग बुधवारी 25 डिसेंबर रोजी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र दुसर्या दिवशी म्हणजे 26 डिसेंबर रोजी राणीची बाग बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबतची माहिती राणी बाग प्रशासनाने दिली आहे.
राणीची बाग दर बुधवारी प्राणी व पक्षी यांच्या देखभालीसाठी आणि प्राणी पिंजरे दुरुस्ती कामासाठी बंद ठेवण्यात येते. त्यामुळे राणी बाग प्रशासन, कर्मचारी यांना आणि प्राणी, पक्षी यांनाही काहीसा दिलासा मिळतो. प्रशासनाने दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, भायखळा (पूर्व) परिसरातील राणीची बाग (वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय) साप्ताहिक सुटीनिमित्त दर बुधवारी बंद असते. मात्र, मुंबई महापालिकेने यापूर्वी मंजूर केलेल्या एका ठरावानुसार बुधवारी सार्वजनिक सुटी आल्यास त्यादिवशी उद्यान व प्राणिसंग्रहालय जनतेसाठी खुले राहते, तर त्याच्या दुसर्या दिवशी बंद ठेवण्यात येते.
हेही वाचा – Mankhurd Fire : भीषण आगीमुळे भंगार गाळे जळून खाक
25 डिसेंबर बुधवारी रोजी नाताळ (ख्रिसमस) सार्वजनिक सुटी आहे. त्यामुळे मुंबईकर नागरिक, शालेय विद्यार्थी मोठ्या प्रमाणात राणीची बाग बघण्यासाठी गर्दी करू शकतात. जर त्या दिवशी राणीची बाग बंद ठेवल्यास त्यांच्या आनंदावर विरजण पडेल. त्यामुळे राणी बाग प्रशासनाने ही बाब लक्षात घेता बुधवार 25 डिसेंबर रोजी नाताळ सणाच्या दिवशी पर्यटकांसाठी राणीची बाग खुली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र दुसर्या दिवशी म्हणजे गुरुवार 26 डिसेंबर रोजी राणीची बाग बंद ठेवण्यात येणार आहे, असे मुंबई महापालिकेकडून कळविण्यात आले आहे.
हेही वाचा – Passing Policy : 5 वी आणि 8 वीत नापास झालात तर…; केंद्रीय शिक्षण विभागाने बदलले नियम