सावरकरांच्या अवमानाविरोधात हिंदुत्ववाद्यांनी आक्रमक व्हावे

राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल काढलेल्या उद्गाराचा निषेध करत सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी याचा विरोध करण्याचे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी केले आहे.

Vinyaka Damodar Savarkar
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधातील आक्षेपाना साधार स्पष्टीकरण देऊनसुद्धा वारंवार त्यांचा अवमान करण्याच्या प्रयत्न केला जात आहे. रायपूर येथे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीदेखील अशाप्रकारचे वक्तव्य केले आहे, त्यामुळे अशी वक्तव्ये करणाऱ्यांच्या विरोधात महाराष्ट्रासह देशभरातील हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक झाले पाहिजे, असे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी केले आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अंदमानात काळ्या पाण्याची शिक्षा भोगली, कोलू ओढला, त्याचबरोबर अन्य क्रांतिकारकांना अंदमानातून पुन्हा क्रांतिकार्यासाठी जाण्यासाठी कागदोपत्री असलेल्या नियमावलीवर सह्या करण्यास सांगितल्या, स्वतःदेखील हीच कूटनीती वापरली, या सर्व तंत्रांचा विपर्यास करून वारंवार त्यांनी माफी मागितली, असे जनमानसावर बिंबवले जात आहे. मग राहुल गांधी यांचे पणजोबा यांनी स्वातंत्र्यकाळात किती वेळा तुरुंगवास भोगला, तुरुंग म्हणजे कुठल्या तरी महालात त्यांना ठेवले जायचे, नजरकैद सुरू झाली की लगेच ते माफी मागून मोकळे होत सुटत. तुकड्या तुकड्या सहा वर्षे भोगलेल्या शिक्षेचे ते भांडवल करत आहेत, हे सगळ्या जगाला ठाऊक आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी अगोदर इतिहासाचा अभ्यास करावा. चुकीचा इतिहास सांगू नये, स्वातंत्र्यासाठी लाखो क्रांतिकारकांनी रक्त सांडले आहे. त्यांना विसरता येणार नाही. त्यामुळे केवळ अहिंसेच्या आधारावर रक्ताचा थेंबही न सांडता स्वातंत्र्य मिळाले, असे धादांत खोटे आणि न पटणारे विधान करून नव्या पिढीची दिशाभूल करू नये, असेदेखील रणजित सावरकर यांनी म्हटले आहे.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याविरोधात कुणी बोलले तर सारा बंगाल पेटून उठतो, त्याप्रमाणेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात बोलल्यास महाराष्ट्रातील व देशातील देखील हिंदुत्ववादी संघटनांनी पेटून उठले पाहिजे. त्यांना सळो की पळो करून सोडले पाहिजे, असे आवाहनदेखील रणजित सावरकर यांनी केले असून यापुढील काळात स्वातंत्र्यवीरांच्या विरोधात बोलणा-यांविरोधात कायदेशीर कारवाई देखील करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.