स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव : देशाला बलशाली बनविण्याच्या मोहिमेत नागरिकांनी सहभागी व्हावे – रावसाहेब दानवे

raosaheb danve

नाशिक – देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होत आहेत. हा भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केले आहे. येणाऱ्या वर्षांमध्ये कष्ट करून देशाला बलशाली बनविण्यासाठी तयार केलेल्या मोहिमेत नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केंद्रीय रेल्वे व गौण, खणीकर्म राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी केले आहे.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘स्वराज्य महोत्सव’ अंतर्गत आज शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांच्या प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रभात फेरीचा समारोप कार्यक्रम हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान (गोल्फ क्लब) येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रम प्रसंगी केंद्रीय राज्‍यमंत्री रावसाहेब पाटील दानवे बोलत होते. या कार्यक्रमास विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे, सहायक जिल्हाधिकारी वर्षा मीना, उपजिल्हाधिकारी (रोहयो) तथा हर घर तिरंगा मोहिमेचे नोडल अधिकारी नितीनकुमार मुंडावरे, नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षण अधिकारी सुनिता धनगर यांच्यासह शहरातील विविध शाळांचे शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे म्हणाले की, दीडशे वर्षांच्या गुलामगिरीच्या काळात आपल्या देशाने व आपण सर्वांनी खूप काही गमावले आहे. परंतू पुढील वर्षांमध्ये प्रयत्नांची पराकाष्टा करून देशाला बलशाली बनविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. या नियोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होवून देश प्रगतीच्या मार्गावर यशस्वीपणे वाटचाल करेल, यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असेही केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी सांगितले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यामध्ये ‘स्वराज्य महोत्सव’ अंतर्गत जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन, नाशिक महानगरपालिका, जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांच्या प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रभात फेरीत सर्व विद्यार्थी शालेय गणवेशात हातात तिरंगा घेवून भारत माता की जय घोषणा देत उत्साहाने रॅलीमध्ये सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे एनसीसी, एनएसएसचे विद्यार्थी देखील प्रभात फेरीच्या समारोप कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचा समारोप उंटवाडी येथील माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांचे ढोल पथक, मराठा हायस्कूलच्या विद्यार्थींनी यांनी समुह गीत व राष्ट्रगीत सादर करून करण्यात आला.