मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीने बहुमत गाठत एकहाती सत्ता आणली. त्यानंतर मुख्यमंत्रिपदाचा दावेदार कोण? याची चर्चा रंगली आहे. निकालाला 2 ते 3 दिवस येऊन गेले असताना अद्याप मुख्यमंत्री कोण होणार? यासाठी महायुतीला विलंब लागत असल्याचे चर्चांना उधाण आले आहे. शिवसेना शिंदे गटाची एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा व्यक्त करत आहेत. पण भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी केलेल्या विधानामुळे चर्चा रंगली आहे. (Raosaheb Danve on chief minister ship in mahayuti)
भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे म्हणाले की, “एकनाथ शिंदे यांच्यासोबत युती करताना, ‘तुमच्या नेतृत्त्वात निवडणुका लढत आहोत,’ असे एकनाथ शिंदेंना सांगितले होते, यात शंका नाही. पण मुख्यमंत्री पदाबाबत कोणीच कोणाला शब्द दिला नव्हता. देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर एकमत आताही आहे.” असे विधान करत त्यांनी मोठे संकेत दिले आहेत. “विधानसभेच्या निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही एकत्र लढलो. राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नेतृत्त्वात लढलो. आम्ही निवडणुका एकत्र लढत असल्याचे तेव्हा सांगितले. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? याबाबत आम्ही निकालानंतर एकत्र बसून निर्णय घेऊ, असे ठरले होते. सत्ता येईल तेव्हा आम्ही मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करू, असे बैठकीत ठरले होते.” असे रावसाहेब दानवे म्हणाले.
दरम्यान, मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असणार? याची राज्यात चर्चा सध्या जोरात सुरू आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, म्हणून आग्रही आहेत. तर दुसरीकडे भाजपाने मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, याचवेळी भाजपने एकनाथ शिंदे यांना दोन पर्याय दिल्याचेही कळते. तसेच, राष्ट्रवादीनेही अजित पवार यांच्या नावाचा आग्रह धरला असला तरीही देवेंद्र फडणवीस यांच्या नावालाही सहमती दर्शवली आहे. त्यामुळे आता महायुतीमध्ये काय निर्णय होणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने 288पैकी 230 जागा जिंकल्या. त्यात भाजपाने इतिहासातील सर्वोच्च 132 जागांचा आकडा गाठला. तर, शिवसेनेने यंदाच्या निवडणुकीत 57 जागांवर यश मिळवले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने 41 जागा जिंकल्या.
Edited by Abhijeet Jadhav