मुंबई : महायुतीचे सरकार येताच मोठी बातमी समोर आली आहे. रश्मी शुक्ला यांची पुन्हा एकदा राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवारी (25 नोव्हेंबर) रात्री उशिरा याबद्दलचे आदेश काढण्यात आले आहेत. तर, मंगळवारी (26 नोव्हेंबर) सकाळी रश्मी शुक्ला आपला पदभार स्वीकारणार आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने पदमुक्त केले होते. आता पुन्हा एकदा त्यांना सेवेत दाखल करून घेण्यात आले आहे. (Rashmi Shukla ips to be new director general of police dgp maharashtra)
हेही वाचा : Jitendra Awhad : जिंकल्यानंतरही आव्हाडांना ईव्हीएमवर शंका; म्हणाले, मी जिंकलो कसा?
रश्मी शुक्ला यांच्यावर काँग्रेस सातत्याने टीका करत होते. निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर राज्य सरकारकडून रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरून हटवून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले होते. त्यानंतर संजयकुमार वर्मा यांची निवडणुकीच्या काळापुरती पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली. रश्मी शुक्ला या राज्यातील आयपीएस अधिकारी आहेत. त्यांच्यावर फोन टॅपिंगचे आरोप असल्यामुळे त्यांना निवडणुकीच्या काळात सक्तीच्या रजेवर पाठवले होते. काँग्रेसने त्यांची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानंतर आयोगाने ही कारवाई केली होती. 30 जून 2024 रोजी शुक्ला या निवृत्त झाल्या आहेत. महायुती सरकारने त्यांना पोलीस महासंचालक म्हणून दोन वर्षांची मुदतवाढ दिली होती.
2014 ते 2019 या काळात रश्मी शुक्ला राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुख होत्या. त्या दरम्यान त्यांनी काँग्रेस नेते नाना पटोले यांच्यासह अनेकांचे फोन टॅप केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. 2014 ते 2019 या काळात राज्यात देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजप-शिवसेनेचे सरकार होते. या काळात शुक्लांना अनेक महत्त्वाची पदे मिळाली होती. याच काळात त्या गुप्तचार विभागाच्या प्रमुख होत्या. पोलिस महासंचालक पदी नियुक्ती होण्यापूर्वी त्या सशस्त्र सीमा दलाच्या केंद्र प्रमुख तसेच पुणे पोलीस आयुक्त होत्या. राज्याच्या पहिल्या महिला पोलिस महासंचालक होण्याचा मान त्यांना मिळाला. 30 जून 2024 रोजी त्या निवृत्त होणार होत्या. पण राज्यातील महायुती सरकारने त्यांना मुदतवाढ दिली होती. विधानसभा निवडणुकीचा निकाल महायुतीच्या बाजूने लागल्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांचे कमबॅक झाले आहे.