रत्नागिरी : मागील काही दिवसांपासून सातत्याने अनधिकृत बांधकामांवर प्रशासनाचा हातोडा पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. पालघर जिल्ह्यातील वसई-नालासोपारा येथील अनेक अनधिकृत इमारती पाडण्यात आल्या. अशात रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदराचा विकास करण्यासाठी येथील किनाऱ्यावर असलेली अनधिकृत बांधकामं आणि अतिक्रमणं हटवण्यात आली. या तोडक कारवाईला सोमवारी सकाळी 6 वाजल्यापासून सुरूवात झाली आहे. (Ratnagiri Administration takes strict action on illegal constructions in Mirkarwada)
मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यातील मिरकरवाडा हे महत्त्वाचे मासेमारी बंदर आहे. मिरकरवाडा प्राधिकरणाच्या माध्यमातून मत्स्य व्यवसाय विभाग या बंदराचा विकास करणार आहे. मात्र, अनधिकृत बांधकामं आणि अतिक्रमणं या मारकवाडाच्या किनाऱ्यावर करण्यात आली होती. त्यामुळे या बंदरातील विकास कामे थांबली होती. परंतू, आता राजकीय पातळीवर त्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. तसेच, बंदर विकासाच्या कामांना प्राधान्य देण्याचे निश्चित करण्यात आले. त्यामुळे किनारपट्टीवर असलेल्या अनधिकृत बांधकामांवर जेसीबीच्या सहाय्याने तोडक कारवाई करण्यात आली.
सोमवारी सकाळी 6 वाजल्यापासून जेसीबीच्या सहाय्याने बांधकामे पडण्यास सुरुवात झाली आहे. तसेच, किनारपट्टी पूर्ण मोकळी झाल्यानंतर मिरकरवाडा विकास आराखड्यानुसार तातडीने बंदराच्या कामाला सुरूवात केली जाणार आहे. दरम्यान, मारकरवाडा येथील अनधिकृत बांधकाम 23 जानेवारीला काढण्यात येणार होती. मात्र, येथील मच्छीमारांनी सामान हलवण्यासाठी पर्यायी जागा द्यावी आणि वेळ द्यावा, अशी मागणी केली होती. त्यानुसार, मच्छिमारांना 26 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली. परिणामी 23 जानेवारी होणारी कारवाई तीन दिवस लांबली. त्यानंतर सोमवार 27 जानेवारी रोजी सकाळपासून बांधकामे हटवण्याच्या कारवाईला सुरूवात करण्यात आली.
नालासोपाऱ्यातील अनधिकृत बांधकामांवर प्रशासनाचा हातोडा
नालासोपारा पूर्वेच्या अग्रवाल नगरी येथील आरक्षित जागेवर 41 अनधिकृत इमारती बांधण्यात आल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने या इमारतींवर कारवाईचे आदेश नोव्हेंबर महिन्यात कारवाईला सुरुवात करण्यात आली होती. पहिल्या दिवशी 7 अतिधोकादायक इमारती निष्काषित करण्यात आल्या होत्या. त्यातच 34 इमारतींमधील रहिवाशांनी घरे खाली न केल्याने कारवाई थंडावली. ही कारवाई 31 डिसेंबरपर्यंत होणे अपेक्षित होते. मात्र रहिवाशांच्या विरोधामुळे विलंब झाला होता. मात्र, आता महापालिकेने पुन्हा कारवाईला सुरवात केली आहे. 23, 24 आणि 27, 28 जानेवारी असे 4 दिवस कारवाई केली जाणार आहे. या कारवाईसाठी पोलिसांकडून पालिकेला 400 पोलिसांचा बंदोबस्त मिळाला आहे.
हेही वाचा – Sanjay Raut : स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढण्याबाबत राऊतांचे मोठे विधान