घरताज्या घडामोडीबनावट ई-पासचे रत्नागिरी कनेक्शन

बनावट ई-पासचे रत्नागिरी कनेक्शन

Subscribe

नाशिक पोलिसांची कारवाई; एकास अटक

गावी जाण्यासाठी बनावट ई-पास देत नागरिकांसह राज्य सरकारची फसवणूक करणार्‍या एका भामट्यास नाशिक पोलिसांनी पडवे (ता. गुहागर, जि. रत्नागिरी) येथून अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून मोबाईल व टॅब जप्त केला असून, न्यायालयाने त्याला शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. कृष्णा ऊर्फ राकेश सदानंद सुर्वे (३२, सध्या रा. आजदेगाव, डोंबिवली, मूळ रा. राह, मु.पो.पडवे, ता. गुहागर, जि. रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २४ मार्चपासून देशभर लॉकडाऊन सुरू आहे. अत्यावश्यक सेवा पुरविण्यासाठी व जिल्हाबाहेर जाण्यासाठी शहर पोलीस आयुक्तालयात कोरोना मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षामार्फत नागरिकांना ई-पासव्दारे प्रवासाची परवानगी दिली जात आहे. काही दिवसांपासून व्हॉट्सअ‍ॅपवर दोन अनोळखी व्यक्तींची ई-पासबाबत संवाद झालेली ध्वनीफित सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यातील एक व्यक्ती दुसर्‍याकडे ई-पासबाबत चौकशी करत असून, ई-पास देण्यासाठी २ हजार रूपये खर्च येईल. ठाणे व मुंबईवरून पास बंद करण्यात आले असून नाशिकवरून पास काढून देईल, असे सांगतो. ही ध्वनीफित शहर पोलिसांना मिळताच पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी चौकशी करून कारवाईची सूचना पोलिसांना केली. पोलीस तपासात ई-पास देणारा व्यक्ती गुहागर (ता. रत्नागिरी) असल्याचे उघडकीस आले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत पडवे गावातून कृष्णा सुर्वे याला ताब्यात घेतले. सुर्वेला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

- Advertisement -

नाशिक पोलिसांच्या नावाने स्विकारायचा २ हजार
शहर गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक अभिजित सोनवणे यांनी तपास सुरू केला. तपासात सुर्वे नावाची व्यक्ती नाशिक पोलिसांच्या नावाने प्रती व्यक्ती २ हजार रूपये स्विकारून ई-पास बनवून देण्याचे आश्वासन देत असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी सोनवणे यांनी मंगळवारी (दि.२५) सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

रत्नागिरीला जाणार्‍या १५ जणांना दिले ई-पास
पैसे घेवून मुंबई येथून रत्नागिरीला जाणार्‍या १५ प्रवाशांना ई-पास इतर ठिकाणावरून दिल्याचे आरोपी सुर्वे याने पोलिसांना सांगितले. नाशिक शहर व राज्यातील पोलिसांशी ओळख व संपर्क नसल्याचेही त्याने सांगितले.

- Advertisement -

नाशिक पोलिसांचे आवाहन
ई-पाससाठी आरोपी कृष्णा सुर्वे याने कुणाकडून पैसे घेत ई-पास दिला माहिती असल्यास नागरिकांनी नाशिक पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -