लोकसभा निवडणुसाठी वर्षभरापेक्षा कमी कालावधी उरला आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे विनायक राऊत विद्यमान खासदार आहेत. पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून विनायक राऊत, शिवसेना ( शिंदे गटाकडून) किरण सामंत आणि भाजपकडून निलेश राणे यांच्या नावाची चर्चा आहे. रत्नागिरी- सिंधुदुर्गाच्या लोकसभा जागेसंबंधी मंत्री उदय सामंत यांनी सूचक आणि मोठं विधान केलं आहे. उदय सामंत म्हणाले की, ही जागा शिवसेनाच लढवणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. (Ratnagiri Sindhudurg seat of Mahayuti war dispute between Uday Samant and Nitesh Rane)
उदय सामंत यांच्या वक्तव्यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी तत्काळ भाष्य करून या मतदारसंघावर दावा ठोकला. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा उमेदवार पक्ष श्रेष्ठी ठरवतील, कोणीही घाई करू नये. मंत्री उदय सामंत यांची इच्छा आपल्या भावाने रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक लढवावी, अशी असेल तर तुम्ही शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याबरोबर राहा आणि भाऊ किरण सामंत यांना भाजपमध्ये पाठवा. मग कोणीही दुखावणार नाही. किरण सामंत हे माझ्या माहितीत कोणत्याच पक्षाचे नाहीत त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये यावे, मग त्यांचा विचार होईल, असं आमदार नितेश राणे यांनी म्हटलं.
महायुतीत तणाव?
किरण सामंत यांच्या उमेदवारीवरून रत्नागिरीच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आहे. शिंदे गटानं रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवर दावा सांगितला, तर महायुतीमध्ये तणाव वाढू शकतो. कारण सिंधुदुर्गमध्ये अजूनही नारायण राणे यांचं बऱ्यापैकी वजन आहे.
सिंधुदुर्गात आधी नारायण राणे यांचं वर्चस्व होतं. पण 2014 नंतर हा बालेकिल्ला ढासळला. 2014 मध्ये आधी नारायण राणे यांचे सुपूत्र निलेश राणे यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर विधानसभेला कुडाळमधून नारायण राणे यांचा पराभव झाला. लोकसभेला ठाकरे गटाचे विनायक राऊत आणि विधानसभेला शिवसेनेचे वैभव नाईक आमदार झाले.फक्त कणकवली विधानसभेची जागा नितेश राणे यांच्याकडे आहे. सिंधुदुर्गात नारायण राणे यांच्या रुपाने भाजपकडे एक वजनदार नेता आहे. पण महायुतीच्या या जागेवरून रस्सीखेच होऊ शकते.
(हेही वाचा: पंकजा मुंडेंवर त्यांच्याच पक्षाकडून अन्याय, विचार करून योग्य निर्णय घ्यावा; राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याचा सल्ला )