राऊतांनी आम्हाला शिवसेनेबाबत काहीही शिकवण्याची गरज नाही – शहाजीबापू पाटील

१५ दिवसांनी काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल.., फेम सांगोला विधानसभा मतदारसंघाचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील आपल्या मतदार संघात परतले आहेत. यावेळी जनतेनं त्यांचं जंगी स्वागत केलं आहे. परंतु सांगोल्यात आ्लयानंतर त्यांनी जोरदार भाषण ठोकलं. यावेळी त्यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

आम्हाला पळून नेलं, मारून नेलं अशी चर्चा होती. परंतु आम्हाला कोणीही काहीही केलेलं नाही. दीड लाख जनतेचा आशीर्वाद आमच्या पाठीमागे आहे. महाराष्ट्रातील ५० लाख मुलं माझ्यावर जीवापाड प्रेम करतात. ज्या दिवशी शिवसेनेचा वर्धापन दिन झाला. सगळ्या आमदारांना व्यवस्थित बसवण्यात आलं. तेव्हा संजय राऊत हे शिवसेनेचे नारदमुनी…त्यांनी चार ते पाच मिनिटं भाषण केलं. मात्र, तेव्हाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि माजी कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांचं आगमन झालं. परंतु दोन मिनिटानंतर उद्धव ठाकरेंनी राऊतांना भाषण सुरू ठेवण्यास सांगितले. संजय राऊतांनी आम्हाला शिवसेनेबाबत काहीही शिकवण्याची गरज नाही, असा इशारा शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिला.

माझे आई-वडील आणि चार भाऊ वारले तरीदेखील माझ्या डोळ्यात अश्रू नव्हते. दुख:ला सामोरं जायचं. हे मला भगवंत श्री कृष्णाने शिकवलं. ज्यावेळी मी गंभीर असतो. त्यावेळी इतरांना वाटतं की, शहाजीबापू काय तरी भाषणं रचायला लागले. त्यावेळी माझं भाषण डोक्यात सुरू असतं. भारतीय सैनिक जरी माझ्या समोर उभे केले तरी माझ्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव नसतो. मला तालुक्याचा विकास करायचा आहे. त्याबाबत मी विचार करत होतो, असं आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले.

बंडखोरी झाल्यानंतर संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर विविध आरोप आणि टीका केली होती. बंडोखर आमदारांना रेडा किंवा वेश्या देखील संबोधलं होतं. याबाबत बोलताना शहाजीबापू पाटलांनी थेट प्रत्युतर देणं टाळलं. राऊतांच्या नादी लागण्यात काय अर्थ आहे? त्यांच्याबाबत सांगोल्याच्या मैदानात बोलणार, असे ते म्हणाले होते.

दरम्यान, गेल्या ५०-६० वर्षांपासून या तालुक्याचं नेतृत्व वैचारिक विचारातून झालं आहे. ही जी भूमिका आहे, ती व्यक्तीगत माझी शहाजीबापू पाटलांची भूमिका नाही, ही माझ्या सांगोला तालुक्यातील जनतेची भूमिका आहे, असं देखील पाटील म्हणाले.


हेही वाचा : सरकारमध्ये जाणार नसल्याची घोषणा केली आणि…देवेंद्र फडणवीसांनी उघडलं गुपित