पत्राचाळ घोटाळा प्रकरणात खासदार संजय राऊत यांना जामीन मिळाला आहे. साधारण १०० दिवसांनी जामीन मिळाल्यानंतर ते आज (१० नोव्हेंबर) माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच माजी मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेण्यासाठी ‘मातोश्री’ या उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचले. या भेटीनंतर आदित्य ठाकरे यांनी संजय राऊतांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. तसेच, ‘आपल्याला सगळीकडे दिसतेय की ‘टायगर इज बॅक’ आणि ‘राऊत इज नॉट आऊट’, असेही म्हटले. (Raut is not out Aditya Thackeray welcomes Sanjay Raut on Matoshree after bail)
संजय राऊत यांनी तुरुंगातून बाहेर आल्यावर आज ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी मातोश्रीबाहेर संजय राऊत यांचे जंगी स्वागत करण्यात आले. स्वत: आदित्य ठाकरे यांनी संजय राऊत यांची गळाभेट घेतली.
उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर ‘मातोश्री’ येथे उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना त्यांनी संजय राऊत यांचे स्वागत केले. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनीही त्यांचे स्वागत करत “आपल्याला सगळीकडे दिसतेय की ‘टायगर इज बॅक’ आणि ‘राऊत इज नॉट आऊट”, असे म्हटले.
याशिवाय, “हा सगळा प्रकार बघता एकच दिसतेय की, ज्या कारणाने राजकीय लोकांना छळले जातेय. त्याच्यामागे केसेस, तडीपार लावल्या जातात. उद्या पत्रकार म्हणून आपल्याला सामोरे जावे लागणार आहे. कारण कुठेतरी देशातील लोकशाही आणि संविधान संपून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे संपूर्ण देश पाहत आहे”, असे म्हटले. तसेच, “या सगळ्याविरोधात आपल्याला नागरिक म्हणून आवाज उठवणे गरजेचे आहे. याविरोधात लढा देणे गरजेचे आहे. कारण आपण गप्प बसलो तर, प्रत्येकाचा आवाज दाबला जाईल. जो कोणी सत्य बोलतोय त्याचा आवाज दाबला जाईल. जो कोणी अन्यायाविरोधात बोलतोय त्याचा आवाज दाबला जाईल”, असे आवाहनही त्यांनी केले.
“लोकशाही संपल्यानंतर हुकूमशाही जशी आपल्या राज्यात वाटत आहे, तशी संपूर्ण देशात वाटायला लागले. प्रत्येक वेळी आम्हाला न्यायालयात न्याय मिळाला आहे”, असेही त्यांनी म्हटले.
या पत्रकार परिशदेत आदित्य ठाकरे यांना कॉंग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी “कॉंग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहे. मी उद्या दुपारी नांदेडमध्ये पोहोचणार आहे. त्यानंतर त्यांच्यासोबत जो काही मार्ग असेल तो चालणार”, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.
हेही वाचा – …राऊतांना पुन्हा गोवण्याचा प्रयत्न होऊ शकतो, उद्धव ठाकरेंचा केंद्रीय यंत्रणांवर निशाणा