राऊतांचं फडणवीसांना जशात तसं उत्तर; म्हणाले, भांग उतरली की सत्ता जाईल!

Sanjay Raut's reply on CM's statement of traitors

मुंबई – आमचे काही मित्र आहेत. त्यांना मागच्या काळात कोणीतरी खोटं सांगून भांग पाजली होती, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल उत्तर भारतीयांच्या धुळवड कार्यक्रमात केली होती. त्यांच्या या टीकेला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. महाराष्ट्रात भांग पिऊन कोण सत्तेवर आलंय? भांग उतरली की सत्ता जाईल, असा घणाघात संजय राऊतांनी केला.

हेही वाचा – आपल्याकडे ३६५ दिवस लोक शिमगा करतात, फडणवीसांची विरोधकांवर टोलेबाजी

संजय राऊत म्हणाले की, ‘महाराष्ट्रात भांग पिऊन कोण सत्तेवर आलंय? भांग उतरली की सत्ता जाईल, आम्ही पूर्णपणे शुद्धीवर आहोत. महाराष्ट्रातील जनता किती शुद्धीवर आहे हे कसब्याच्या निकालाने स्पष्ट झालंय.’
हक्कभंग नोटीसीसंदर्भात त्यांना विचारलं असता ते म्हणाले की, हक्कभंगाची नोटीस मिळाली तेव्हा मी मुंबईत नव्हतो. आता आलो आहे. विधिमंडळातील माझे सहकारी अंबादास दानवे यांच्याशी बोलून पुढील निर्णय घेतला जाईल. ही एक विधिमंडळ प्रक्रिया आहे. एखाद्यावर हक्कभंग लावायचा असेल तर समिती चौकशी करते. पण, मी पुन्हा सांगतो की, विधिमंडळाचा अपमान होईल, असं विधान मी केलेलं नाही. चोरमंडळ हा शब्द एका विशिष्ट गटापुरताच मर्यादित आहे.

या देशातील परिस्थिती अशी आहे की जर तुम्ही अन्यायाविरोधात आवाज उठवाल, तर तुम्हाला गुन्हेगार किंवा देशद्रोही ठरवलं जातं. पण, आम्ही घाबरत नाही. बेकायदापणे शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह काढून घेतलं. तरीही शिवसैनिक रस्त्यावर लढतो आहे. लालू यादव यांना चौकशी लावली. मनिष सिसोदिया यांना अटक झाली. मग गौतम अदानीला साधी नोटीस तरी बजावली का? देशाचा पैसा लुटणाऱ्यांना नोटीसही पाठवत नाहीत आणि विरोधी पक्षावर धाडी टाकतायत. जे असत्य आहे, चुकीचं आहे त्याविरोधात आम्ही उभे राहणारच, असा निर्धारही संजय राऊतांनी बोलून दाखवला.

हेही वाचा – महाराष्ट्रात भाजपाची पुनर्रचना होणार, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे संकेत

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?

“मला फक्त एक-दोन लोकांना सल्ला द्यायचा आहे. उत्तर भारतात होळीच्या दिवशी शिमगा साजरा करण्याची पद्धत आहे. आपल्याकडेही शिमगा साजरा केला जातो. पण आपल्याकडे काही लोक ३६५ दिवस शिमगा करतात. त्यांना मला एवढंच सांगायचंय की, एखाद्या दिवशी शिमगा ठीक आहे. पण उरलेले ३६४ दिवस सभ्य माणसासारखं वागण्याचा प्रयत्न केला, तर उत्तम होईल,” असं फडणवीस म्हणाले होते.