(Raut Vs Shinde) मुंबई : महाराष्ट्र विधानसभेत महायुतीने घवघवीत यश मिळविले असले तरी अद्याप ते सत्तास्थापनेचा दावा करू शकलेले नाहीत. मुख्यमंत्रिपदाचा पेच गेले चार दिवस महायुतीत होता. मात्र, शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी यातून माघार घेतल्यानंतर मुख्यमंत्रिपदासाठी भाजपाचा मार्ग मोकळा झाला आहे. तथापि, या सर्व घडामोडींवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेवर जोरदार टीका केली आहे. (Sanjay Raut’s criticism of Eknath Shinde who gave up his claim on the post of Chief Minister)
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने 288पैकी 230 जागा जिंकल्या. त्यात भाजपाने इतिहासातील सर्वोच्च 132 जागांचा आकडा गाठला. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यापेक्षा दुपटीहून जास्त जागा मिळाल्याने भाजपाने यावेळी मुख्यमंत्रिपद स्वतःकडे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा होत नसल्याने भाजपा नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे. असे असताना, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रिपदावर पुन्हा विराजमान होण्यासाठी आग्रही होते. त्यांचे समर्थक आमदारांचेही तेच म्हणणे आहे. यासंदर्भात त्यांनी बिहारचा दाखला दिला होता.
हेही वाचा – New Govt : …तर एव्हाना राष्ट्रपती राजवट लागली असती, संजय राऊत असे का म्हणाले?
मात्र, काल, बुधवारी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्रिपदाबाबत माघार घेत असल्याचे जाहीर केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी मी बोललो. त्यावेळी त्यांना स्पष्टपणे सांगितले की, तुम्ही जो काही निर्णय घ्याल, ज्याला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा बनवाल तो मला आणि शिवसनेनेला मान्य असेल. माझी अडचण होणार नाही, असा शब्द मी पंतप्रधान मोदी याना दिला आहे, असे शिंदे म्हणाले.
यावरून शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. एकनाथ शिंदे यांना जी शिवसेना मिळाली आहे, ती निवडणूक आयोग तसेच मोदी आणि शहा यांनी दिलेली आहे. जनतेने दिलेली नाही. त्यामुळे जे स्वत:ला शिवसेना समजत आहेत, त्यांनी आपल्या पक्षाचे निर्णय घेण्याचे अधिकार दिल्लीत मोदी-शहा यांना दिले असतील तर, त्यांना यापुढे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेऊ नये. तसेच, महाराष्ट्राचा स्वाभिमान असे शब्द न वापरलेले बरे, असा टोला त्यांनी लगावला आहे. महायुतीतील दोन पक्षांनी दिल्लीलाच सर्वाधिकार दिल्याने आता दिल्लीच महाराष्ट्राचे भवितव्य ठरवेल, असेही त्यांनी सुनावले आहे. (Raut Vs Shinde : Sanjay Raut’s criticism of Eknath Shinde who gave up his claim on the post of Chief Minister)
हेही वाचा – Politics : कपट-कारस्थाने चालूच आहेत, कारण…, ठाकरे गटाकडून भाजपा लक्ष्य