राऊतांचं मानसिक संतुलन बिघडलंय, ठाकरेंनी उपचार करावेत; देशपांडेंचा खोचक टोला

sandeep deshpande

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. याप्रकरणात ठाकरे गटाकडे संशयाची सूई असून भांडुप कनेक्शनही समोर आलं आहे. त्यामुळे संजय राऊत निशाण्यावर आले आहेत. परंतु, संदीप देशपांडे कोण असा सवाल काल संजय राऊतांनी उपस्थित केला होता. त्यावर, संदीप देशपांडे यांनी आज प्रत्युत्तर दिलं आहे.

सुरुवातीला संजय राऊतांविषयी विचारलं असता संदीप देशपांडे म्हणाले की, ते मला ओळखत नाहीत. त्यामुळे न ओळखणाऱ्या व्यक्तीबद्दल मी तक्रार का करेन.” नंतर याचप्रश्नी पत्रकारांनी पुन्हा संदीप देशपांडेंना छेडलं असता ते म्हणाले की, “संजय राऊतांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. मी पत्र लिहून त्यांच्याप्रती काळजी व्यक्त केली होती. त्यांना सारखं वाटतं की त्यांची कोणीतरी सुपारी दिली, ते सतत हल्ल्यासंदर्भात बोलत असतात. याला-त्याला शिव्या घालत असतात. उद्या जर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ठाकरे गटाच्या विरोधात लागला, तर ते न्यायाधीशांनासुद्धा शिव्या घातल्याशिवाय गप्प बसणार नाहीत.

ते पुढे म्हणाले की, “मला संजय राऊतांबद्दल सहानुभूती आहे. त्यांच्यावर उपचार झाले पाहिजे. उद्धव ठाकरे तर मोठे डॉक्टर आहे. उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर उपचार करायला हरकत नाही.”

संदीप देशपांडेंनी काय केले आरोप?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर काल, शुक्रवारी सकाळी शिवाजी पार्कात हल्ला झाला. याप्रकरणी तक्रार दाखल करताना संदीप देशपांडे यांनी वरुण सरदेसाई आणि आदित्य ठाकरे यांचं नाव जबाबात नोंदवलं आहे. आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी मोठा घोटाळा उघडकीस आणला आहे. हा घोटाळा बाहेर येऊ नये म्हणूनच माझ्यावर हल्ला झाला असावा, असा संशय संदीप देशपांडे यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा  ताब्यात घेतलेल्या संशयितांकडून गुन्ह्याची कबुली, हल्ल्यामागचं कारणही सांगितलं!

कोविड काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचं सांगत फर्निचर घोटाळा झाला असल्याचंही संदीप देशपांडे यांनी आज सांगितलं. याबाबत आपण मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांचीही भेट घेतली होती. याप्रकरणाचा सुगावा लागला असेल म्हणून माझ्यावर हल्ला झाला असेल, असं संदीप देशपांडे म्हणाले. तसंच, कोविड काळातील भ्रष्टाचारप्रकरणी इकोनॉमिक्स अफेअर्स विंगने बाळा कदम यांना अटक केली, त्यानंतर ४८ तासांनी माझ्यावर हल्ला झाला, असंही संदीप देशपांडे म्हणाले.

दरम्यान, हल्ल्यामागे कोणाचा हात आहे, याबाबत त्यांनी स्पष्ट नाव उच्चारलं नाही. हे प्रकरण पोलिसांकडे आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत असल्याने मी आज कोणाचंही नाव घेणार नाही, असं संदीप देशपांडे म्हणाले. यामुळे पोलिसांच्या तपासात अडचण येऊ शकते. मात्र, त्यांचा तपास पूर्ण झाल्यानंतर आम्ही लवकरच याप्रकरणातील हल्लेखोर आणि त्यांच्या मास्टरमाईंडची नावं सांगू असं संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केलं.