पुणे : माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. धंगेकरांचा हा प्रवेश शिंदे गटासह महायुतीतील अनेक नेत्यांचा रूचलेला दिसत नाही. परंतु, धंगेकरांच्या कार्यकर्त्यांनी ‘जनतेच्या मनातील आमदार’ म्हणत भाजपचे आमदार हेमंत रासने यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे पुण्यातील महायुतीत धंगेकरांवरून ‘दंगा’ होण्याची शक्यता आहे.
रवींद्र धंगेकर यांनी 2023 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत हेमंत रासने यांचा पराभव केला होता. पण, 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत रासने यांनी धंगेकर यांचा पराभव केला. त्यानंतर काँग्रेसमध्ये अस्वस्थ असलेल्या धंगेकरांनी अलीकडेच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे महायुतीत धुसफूस सुरू होती. आता धंगेकरांच्या कार्यकर्त्यांनी रासनेंना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
पुण्यातील शनिवारवाड्यासमोर धंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनर लावण्यात आला आहे. त्यावर ‘जनतेच्या मनातील आमदार’ असा उल्लेख केला आहे. यामाध्यमातून धंगेकरांच्या कार्यकर्त्यांनी रासनेंना डिवचले आहे. त्यामुळे महायुतीत वितुष्ट निर्माण होण्याची शक्यता आहे.
कार्यकर्ते काही बोलत असतील, ते त्यांचे अनुभवातून आलेले मत
माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी शिवसेना ( शिंदे गट ) पक्षात प्रवेश केला, त्यामुळे शिंदेसेनेचे स्थानिक शिलेदार तर अस्वस्थ झाले आहेतच; पण, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनीही जाहीर नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. “आमच्या पक्षाचे कार्यकर्ते काही बोलत असतील तर ते त्यांचे अनुभवातून आलेले मत आहे,” असे म्हणत खुद्द उच्च त तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही नाराज भाजप कार्यकर्त्यांची पाठराखण केली आहे.