घरमहाराष्ट्रपुणेLok Sabha 2024 : हम साथ चले तो जितेंगे..., पुण्यातून काँग्रेसचा उमेदवार...

Lok Sabha 2024 : हम साथ चले तो जितेंगे…, पुण्यातून काँग्रेसचा उमेदवार निश्चित

Subscribe

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत. परंतु, अद्यापही महाविकास आघाडी किंवा महायुतीकडून जागावाटप जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे काही इच्छुक उमेगवारांकडून स्वतःची उमेदवारी स्वतःच घोषित करण्यात येत आहे. मात्र, काँग्रेसने पुणे लोकसभा मतदारसंघासाठी आमदार रवींद्र धंगेकर यांचे नाव जवळपास निश्चित केले आहे. महाराष्ट्रातील उमेदवारांची नावे ठरविण्यासाठी दिल्लीत काँग्रेसच्या निवड समितीची बैठक बुधवारी सायंकाळी झाली. त्यामध्ये पुण्यातून धंगेकर यांचे नाव ठरल्याची समोर आली आहे. ज्यानंतर धंगेकर यांनीही याबाबतची सूचक पोस्ट शेअर केली आहे. (Ravindra Dhangekar from Pune is the candidate for Lok Sabha from Congress)

हेही वाचा… Congress: बँक खाती गोठवण्याचा कट, सरकारला आम्हाला लाचार बनवायचंय; काँग्रेसचा हल्ला

- Advertisement -

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत गेल्या वर्षी धंगेकर यांनी भाजपच्या बालेकिल्ल्यात विजय मिळविल्याने त्यांचे नाव सर्व राज्यभर चर्चिले गेले होते. महाविकास आघाडी त्या वेळी एकत्रित निवडणूक लढली होती. पण आता धंगेकरांना थेट दिल्लीत पाठवण्याचा निर्णय काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून घेण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे. धंगेकरांनी X या सोशल मीडिया अकाउंटवर याबाबतची पोस्ट शेअर केली आहे. संसदेच्या इमारतीसोबत धंगेकरांनी स्वतःचा फोटो लावला असून “हम साथ चले तो…. जितेंगे. हाथ में हाथ चले तो… जितेंगे. #Ravindradhangekar #धंगेकरपॅटर्न” असे कॅप्शन त्यांच्याकडून देण्यात आला आहे.

महाविकास आघाडीत पुण्याची जागा काँग्रेसच्या वाट्याला येणार आहे, हे आता निश्चित झाले आहे. खासदार सुरेश कलमाडी यांच्यानंतर पुण्यातून गेल्या दोन निवडणुकीत भाजपाने मोठा विजय मिळविला. गेल्या निवडणुकीत काँग्रेसतर्फे लढलेले मोहन जोशी, पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद सावंत हेही निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. त्याचबरोबर माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, गोपाळ तिवारी, आबा बागूल, संग्राम खोपडे हेही इच्छुक होते. काँग्रेसच्या निवड समितीच्या बैठकीला महाराष्ट्रातून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार हेही उपस्थित होते. त्याचवेळी धंगेकरांचे नाव पुण्यातून निश्चित करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

महत्त्वाची बाब म्हणजे, मनसेला जय महाराष्ट्र केलेले वसंत मोरे हे महाविकास आघाडीकडून लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत, असे त्यांच्याकडून वारंवार सांगण्यात आले आहे. परंतु, अद्याप तरी मविआकडून योग्य ऑफर न मिळाल्याने याबाबतची कोणतीही चर्चा पुढे होऊ शकलेली नाही. त्यामुळे आता रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिल्यानंतर वसंत मोरे नेमका काय निर्णय घेणार यांकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -