Homeमहाराष्ट्रRavindra Waikar & ED : अजूनही निष्ठा 'मातोश्री'वरच... पण ईडीचा तुरुंगवास नको;...

Ravindra Waikar & ED : अजूनही निष्ठा ‘मातोश्री’वरच… पण ईडीचा तुरुंगवास नको; रवींद्र वायकरांची व्यथा

Subscribe

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या एका भूखंडव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) रडारवर असलेले ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर हे शिंदे गटात जाणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. मात्र, मातोश्रीबद्दल निष्ठा असलेल्या रवींद्र वायकर यांची स्थिती अद्यापही संभ्रमाचीच आहे. त्यांना शिंदे गटात न जाता ईडीच्या ससेमिऱ्यातून सुटका हवी असल्याचे त्यांच्या एका निकटवर्तियाने ‘आपलं महानगर’शी बोलताना सांगितले.

हेही वाचा – Nitin Deshmukh : फडणवीसांनी माझा गेम करण्याचं षडयंत्र रचलं होतं! नितीन देशमुखांचा गौप्यस्फोट

शिवसेनेत मोठी फूट पडल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिलेल्या प्रमुख नेत्यांची एका पाठोपाठ एक अशी केंद्रीय यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे. त्यात प्रामुख्याने खासदार संजय राऊत, माजी मंत्री अनिल परब, माजी महापौर किशोरी पेडणेकर तसेच माजी मंत्री रवींद्र वायकर यांचा समावेश आहे. मैदानासाठी राखीव ठेवण्यात आलेला महापालिकेचा आठ हजार चौरस मीटरचा भूखंडावर उभारलेले पंचतारांकित हॉटेल तसेच मनी लॉंड्रिंगप्रकरणी रवींद्र वायकर यांची ईडी चौकशी सुरू असून अलीकडेच 17 आणि 23 जानेवारी तसेच 10 फेब्रुवारी असे तीनवेळा समन्स बजावण्यात आले होते.

केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीचा फेरा वाचविण्यासाठी विरोधी पक्षातील अनेक दिग्गज नेते भाजपा आणि त्याच्या मित्रपक्षांच्या साथीला जाऊन उभे राहिल्याचे चित्र देशभरात आहे. अशा वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त रवींद्र वायकर शिंदे गटात जाण्याची चर्चा रंगली आहे. पण रवींद्र वायकर हे अद्यापही द्विधा मन:स्थितीत असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयाने सांगितले.

ईडीने चौकशीचा फास आणखी आवळल्यानंतर मला अटक होऊ शकते. पण मी काहीच न केल्याने मला जेलमध्ये जायचे नाही आणि पूर्वीपासून एकनाथ शिंदे यांच्याशी फारसे सख्य नसल्याने मला शिंदे गटातही जायचे नाही. त्यामुळे आपल्यासाठी केंद्रात गृहमंत्री अमित शहा किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे शब्द टाकावा, अशी इच्छा त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यक्त केली. मात्र, याआधी संजय राऊत आणि अनिल परब यांच्यासाठी आपण कधी भाजपाच्या शीर्षस्थ नेत्यांसमोर झुकलो नाही; आता तुमच्यासाठी या नेत्यांना साकडे घातले तर, राऊत आणि परब यांच्या भावना दुखावल्या जातील. शिवाय, आता ज्यांची चौकशी सुरू आहे, ते देखील तशीच अपेक्षा बाळगतील आणि मग तो पायंडाच पडेल, असा तर्क देत उद्धव ठाकरे यांनी याबाबत असमर्थता दर्शवली आहे, अशी माहितीही या निकटवर्तीयाने दिली.

हेही वाचा – Bharat Ratna : राम मंदिराच्या लढ्यातील दोन्ही शिलेदारांना भारतरत्न; वाचा सविस्तर…

अशा परिस्थितीत रवींद्र वायकर आता आणखी आपल्यासोबत कोण बाहेर पडू शकतो, याची चाचपणी करत आहेत. आपण कोणतेही चुकीचे काम केले नाही. केवळ राजकीय सूडापोटी आपली चौकशी सुरू आहे आणि यात माझा बळी जाण्याची शक्यता आहे. मला विविध आजार असून शरीरात सहा स्टेंट आहेत. त्यामुळे मला अधिक चिंता आहे. मी अजूनही उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहू इच्छितो, पण ईडीचा दबाव इतका आहे की, काही ना काही तरी निर्णय घ्यावा लागेल, असे वायकर यांना वाटत असल्याचे निकटवर्तीयाने सांगितले. त्यांच्याबरोबरच त्यांच्या पत्नीमागे देखील चौकशीचा ससेमिरा लागल्याने रवींद्र वायकर जास्त व्यथित झाले असल्याचे त्याने सांगितले.

हेही वाचा – Mumbai Sea Link : मुंबईत होणार आणखी एक सागरी पूल, ‘या’ मार्गावरील प्रवास होणार सुखकर