घरमहाराष्ट्र'गिरणी कामगारांप्रमाणे आम्हालाही घरे मिळावीत'

‘गिरणी कामगारांप्रमाणे आम्हालाही घरे मिळावीत’

Subscribe

मुंबईतील गिरणी कामगारांप्रमाणे आम्हालाही या जागेत घरे मिळावीत, अशी मागणी रेमंड कंपनीतील कामगारांनी केली आहे.

ठाण्यातील बहुतेक बड्या कंपन्या बंद पडून त्याजागी आलिशान निवासी गृहसंकुल उभी राहिली आहेत. एकेकाळी ठाणे शहराची भाग्यरेखा समजली जाणारी रेमंड कंपनीही काही वर्षांपूर्वी काळाच्या पडद्याआड गेली. पूर्व द्रूतगती मार्गालगत मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या कंपनीच्या जागेवरही निवासी संकुल उभे राहणार आहे. काही दिवसांपूर्वी रेमंड उद्योग समूहाचे संचालक गौतम सिंघानिया यांनी कंपनीच्या जागेवर निवासी संकुल उभारणार असल्याची घोषणा केली आहे. मुंबईतील गिरणी कामगारांप्रमाणे आम्हालाही या जागेत घरे मिळावीत, अशी मागणी रेमंड कंपनीतील कामगारांनी केली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

शासनाने उद्योग व्यवसायासाठी १२६ एकरचा भूखंड कंपनीला दिला होता. १९२५ मध्ये या जागेवर वाडिया मिल होती. दोन वर्षानंतर याठिकाणी रेमण्ड वुलन मिल सुरू झाली. अल्पावधीतच कंपनीचा नावलौकिक वाढला. देशविदेशात तिची कीर्ती पोहोचली. मुंबईतील गिरण्यांच्या जागी गृहसंकुले उभे राहण्याचे लोण नव्वदच्या दशकात ठाण्यात पोहोचले. घोडबंदर रोड परिसरातील अनेक कंपन्या बंद पडून तिथे गृहनिर्माण सोसायट्या झाल्या. रेमण्डने कंपनीनेही १९९५ मध्ये कंपनीच्या जागेवर गृहप्रकल्प विकसीत करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांना कामगारांनी पाठवले निवेदन

या प्रस्तावाच्या प्रती जिल्हाधिकारी कार्यालयातून गहाळ झाल्याने त्याबाबत पोलिसांत तक्रारही करण्यात आली होती. कामगारांना मात्र या सर्व प्रकाराविषयी अनभिज्ञ ठेवण्यात आले होते. कंपनीतर्फे जागा विकसीत करण्याचा प्रयत्न सुरू असतानाच, कामगारांवर स्वेच्छा निवृत्तीसाठी दबाव आणला जात होता. काहींनी मोठ्या रकमेच्या आशेने तर काहींनी कंटाळून स्वेच्छा निवृत्ती पत्करली. अजूनही काही कामगारांच्या मागण्या बाकी आहेत. आता मार्च महिन्यात कंपनीच्या मालकानेच निवासी गृहसंकुल उभारण्याची मागणी केल्याने कामगारांनी त्यांनाही हक्काची घरे मिळावीत, असा आग्रह धरला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सर्व संबंधितांना निवेदन देण्यात आले असून त्यावर ३०० कामगारांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

ज्याप्रमाणे मुंबईतील गिरणी कामगारांना हक्काची घरे मिळाली आहेत. त्याच पद्धतीने रेमण्ड मधील निवासी संकुलातही आम्हाला आमची हक्काची घरे मिळावीत. अन्यथा याबाबत आम्ही न्यायालयात लढा ऊभारू.
– अनिल महाडीक, कामगार
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -