घरताज्या घडामोडीPMC Bank : खातेदारांना दिलासा, आता पैसे काढण्याची मर्यादा दुप्पट!

PMC Bank : खातेदारांना दिलासा, आता पैसे काढण्याची मर्यादा दुप्पट!

Subscribe

आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी पंजाब अँड महाराष्ट्रा को-ऑपरेटिव्ह बँक अर्थात पीएमसी बँकेच्या खातेदारांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलासा दिला आहे. या बँकेतून खातेदारांना पैसे काढण्याची मर्यादा आत्तापर्यंत फक्त ५० हजार इतकी होती. आता ती मर्यादा वाढवून १ लाख करण्यात आली आहे. आरबीआयने काही महिन्यांपूर्वी पीएमसी बँकेवर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी निर्बंध लादले आहेत. त्यामुळे पीएमसी बँकेचे लाखो खातेदार हवालदिल झाले होते. प्रारंभी ही मर्यादा १० हजार होती. त्यानंतर ती वाढवून ५० हजार करण्यात आली होती. आता ती मर्यादा १ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. दरम्यान, एकीकडे पैसे काढण्याची मर्यादा जरी आरबीआयने वाढवली असली, तरी त्यासोबत बँकेवरचे निर्बंध अजून ६ महिन्यांसाठी म्हणजे २२ डिसेंबर २०२०पर्यंत वाढवण्यात आले आहेत. त्यामुळे बँकेच्या खातेदारांवर टांगती तलवार मात्र कायम आहे.

सप्टेंबर २०१९मध्ये पीएमसी बँकेकडून केल्या गेलेल्या आर्थिक बेशिस्तीवर आरबीआयने ताशेरे ओढले आणि बँकेवर निर्बंध लादले. बँकेचं संचालक मंडळ बरखास्त करण्यात आलं आणि बँकेवर प्रशासक नेमण्यात आला. एचडीआयएल आणि अशाच इतर अनेक खातेदारांना दिलेली तब्बल ४ हजार ३५५ कोटींची कर्ज बँकेने लपवली आणि त्याचा भार इतर खातेदारांवर आल्याचा ठपका आरबीआयने ठेवला. या प्रकरणी अजूनही बँकेचं कामकाज नियमित सुरू करून बँक सुरक्षित करण्याचे प्रयत्न आरबीआयकडून सुरू आहेत. मात्र, अद्याप आर्थिक बाजू सावरण्यात यश आलेलं नसल्यामुळे बँकेवरचे निर्बंध अजून ६ महिन्यांसाठी वाढवण्यात आल्याचं आरबीआयने स्पष्ट केलं आहे. दरम्यान, पैसे काढण्याची मर्यादा वाढवल्यामुळे आता बँकेच्या ८० टक्क्यांहून जास्त खातेदारांना आपली पूर्ण ठेवीची रक्कम काढून घेता येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -