लॉकडाऊनमध्ये मध्य रेल्वेने उभे केले ३३ पुल!

मध्य रेल्वेच्या ३३ ठिकाणी पाण्याचा निचरा होण्याच्या क्षमता वाढीसाठी, जलवाहिनी वाढविण्यासह पुलांच्या पुनर्बांधणीचे काम लॉकडाऊन दरम्यान करण्यात आले.

लॉकडाऊन दरम्यान रेल्वे प्रवासी वाहतूक बंद असताना याकालावधीचा उपयोग करून मध्य रेल्वेने पुलांच्या पायाभूत सुविधांची महत्त्वपूर्ण कामे पूर्ण केली. मध्य रेल्वेच्या ३३ ठिकाणी पाण्याचा निचरा होण्याच्या क्षमता वाढीसाठी, जलवाहिनी वाढविण्यासह पुलांच्या पुनर्बांधणीचे काम लॉकडाऊन दरम्यान करण्यात आले. या ३३ पुनर्बांधणी / वाढविलेल्या पुलांच्या कामांपैकी मुंबई विभागात ६, भुसावळ विभागात ४, नागपूर विभागात ३,  पुणे विभागात ९ आणि सोलापूर विभागात ११ कामे झाली.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील  कल्याण व शहड स्थानकांदरम्यान वालधुनी नदी पुलावरील दोन्ही अप आणि डाऊन मार्गावर जीर्ण झालेल्या स्टील गर्डरच्या जागी प्री-स्ट्रेस्ड कॉक्रीट (पीएससी)  स्लॅबसह बदलण्यात  आले. तसेच  पनवेल-कर्जत खंडावर रीइनफोर्सड सिमेंट काँक्रीट (आरसीसी) बॉक्स टाकून पुलाचे पुनर्निर्माण ४ दिवसात पूर्ण करण्यात आले.  यासाठी  सामान्य वाहतूकीच्या परिस्थितीत किमान २० दिवस लागले असते. तसेच वडाळा स्थानकाजवळील रावळी येथे आरसीसी बॉक्स टाकून गटाराची क्षमता वाढविण्यात आली. तर टिळक नगर स्थानकाजवळील पुल येथे आरसीसी बॉक्स टाकून अतिरिक्त जलवाहिनी तयार करण्यात आला. कसारा यार्डातील सूक्ष्म बोगद्याद्वारे ड्रेनेज क्षमता वाढविण्यासह जुन्या पुलाचे पुनर्निर्माण करण्यात आले आहे.

 इतर विभागात कामे

नागपूर विभागातील आमला-नागपूर खंडावरील  दोन जीर्ण पुलांच्या स्टील गर्डर  बदलून पीएससी स्लॅबस्ने टाकण्यात आला. तर आरसीसी बॉक्ससह अमरावती-नरखेड खंडावरील  एका पुलाचे पुनर्वसन करण्यात आले. तर भुसावळ विभागात इगतपुरी -भुसावळ खंडावर  आरसीसी बॉक्सचा समावेश  करुन ४ पुलांचे पुनर्निर्माण. तर सोलापूर विभागात 11 पुलाच्या ठिकाणी आरसीसी बॉक्ससह पुलांचे पुनर्निर्माण करण्यात आले. पुणे विभागात विविध  ठिकाणी आरसीसी बॉक्सद्वारे ५ पुलांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. तर मिरज-कोल्हापूर खंडावरील  दोन पुल आणि पुणे-मिरज खंडावरील दोन पुलांचे  जीर्ण स्टील गर्डर बदलून पीएससी स्लॅब टाकण्यात आले.