Eco friendly bappa Competition
घर उत्तर महाराष्ट्र कोट्यवधींच्या थकीत ई-चलान दंडाची होईना वसुली; आता 'ही' नवीन शक्कल

कोट्यवधींच्या थकीत ई-चलान दंडाची होईना वसुली; आता ‘ही’ नवीन शक्कल

Subscribe

नाशिक : राज्यभरात वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी चालकांविरोधात ई-चलानद्वारे करण्यात आलेला कोट्यवधी रुपयांचा दंड थकीत आहे. थकीत दंड वसूल करण्यासंदर्भात महामार्ग पोलिसांनी सूचना केलेल्या असल्या तरी यात फारसे यश आलेले नाही. त्यामुळे आता वाहनाचा विमा (इन्शुरन्स), पीयूसी, वाहन परवान्याचे नूतनीकरण व विक्री करताना दंड थकीत असेल, तर तो अदा करणे बंधनकारक आहे. यासंदर्भात लवकरच अधिकृत निर्णय घेतला जाणार आहे.

शहरांतर्गत बेशिस्तपणे वाहतूक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करीत वाहने चालविली जातात. अशा वाहनांवर वाहतूक पोलिस, महामार्ग वाहतूक पोलिसांकडून ई-चलानद्वारे ऑनलाइन दंड आकारला जातो. महामार्गांवर भरधाव वाहने चालविल्याने वेगमर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणात स्पीडगनद्वारे ई-चलानद्वारे दंड आकारला जातो. अशा रीतीने राज्यभरातील लाखो बेशिस्त वाहनचालकांविरोधात कोट्यवधींचा दंड ठोठावण्यात आलेला आहे. मात्र, त्यातील बहुतांश दंड थकीत आहे. कोट्यवधी रुपयांचा थकीत दंड वसूल करण्यासाठी पोलिसांकडून न्यायालयामार्फत वाहनचालकांना नोटिसा बजाविल्या जातात. लोकअदालतीच्या माध्यमातून प्रकरणे मार्गी लावण्यासाठीही नोटिसा दिल्या जातात. परंतु, त्यातही वाहतूक पोलिस यंत्रणेला फारसे यश आलेले नाही. त्यामुळे थकीत दंड वसूल करणे जिकिरीचे ठरत आहे.

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर महामार्ग पोलिसांकडून थकीत दंड वसुलीसाठी नव्याने उपाययोजना हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी वाहनाचा दर वर्षी विमा (इन्शुरन्स) काढावा लागतो. वेळोवेळी पीयूसी, वाहन-चालक परवाना नूतनीकरण, वाहन विक्रीसाठी यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाकडे (आरटीओ) जावे लागते. त्यावेळी वाहनावर थकीत दंड असेल तरच इन्शुरन्सची प्रक्रिया पूर्ण होऊ शकेल. त्याचप्रमाणे इतर परवानेही मिळू शकतील. यासंदर्भात महामार्ग पोलिस विभागाकडून प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) व अन्य यंत्रणांसंदर्भात चर्चा सुरू असून, त्यावर लवकरच सकारात्मक निर्णय अमलात येणार आहे.

नाशिक शहरात १३, तर जिल्ह्यात दोन कोटी थकीत

नाशिक पोलिस आयुक्तालय हद्दीमध्ये २०२२ अखेरपर्यंत वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ई-चलानद्वारे १२ कोटी ९३ लाख १७ हजार ९५० रुपयांचा दंड थकीत आहे. जिल्ह्यात एक कोटी ९८ लाख ४३ हजार चारशे रुपयांचा दंड थकलेला आहे. वाहतूक पोलिसांनी लोकअदालतीच्या माध्यमातून काही प्रमाणात दंड वसूल केला परंतु त्याचे प्रमाण अत्यल्प आहे.

“राज्यात ई-चलानद्वारे केलेला दंड मोठ्या प्रमाणात थकीत आहे. थकीत दंड वसूल करण्यासाठी वाहनाचा विमा व पीयूसी काढताना, विक्री आणि परवाना नूतनीकरणावेळी दंड भरल्यानंतरच संबंधित प्रक्रिया करण्यासंदर्भातला निर्णय लवकरच अमलात येणार आहे.” : डॉ. रवींद्र सिंगल, अपर पोलिस महासंचालक, महामार्ग पोलिस

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -