घरमहाराष्ट्रऔषधांच्या पॅकिंगवरून लाल, हिरवे चिन्हे होणार गायब

औषधांच्या पॅकिंगवरून लाल, हिरवे चिन्हे होणार गायब

Subscribe

रुग्णांच्या हिताच्या दृष्टीने लोगो लावणे अयोग्य

औषधांमध्ये असलेले घटक हे शाकाहारी किंवा मांसाहारी आहेत, हे स्पष्ट व्हावे यासाठी पॅकिंगवर लाल किंवा हिरवे चिन्ह लावण्यात येते. त्यामुळे शाकाहारी रुग्णांकडून मांसाहारी औषधे घेणे टाळले जाते. परंतु रुग्णांच्या हिताच्या दृष्टीने लाल किंवा हिरवे चिन्ह लावणे अयोग्य असल्याचे मत औषध नियंत्रक सल्लागार मंडळाकडून व्यक्त करण्यात आले आहे. त्यामुळे आता औषधांच्या पॅकिंगवरील शाकाहार आणि मांसाहार दर्शवणारे लाल आणि हिरवे चिन्ह गायब होणार आहे.

एखादा खाद्यपदार्थ हा रुग्ण त्याच्या आवडीनिवडीनुसार खात असतो. परंतु डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधांमध्ये त्याला त्याची आवडनिवड राखता येत नाही. डॉक्टरांनी सुचवलेली औषधे खाणे त्याला बंधनकारक असते. औषध आणि सौंदर्य प्रसाधन नियम 1945 नुसार कॅप्सूलचे आवरण हे सेल्यूलोजने बनवलेले असेल तर त्याच्या पॅकिंगवर शाकाहारचे चिन्ह लावण्यात यावे. परंतु बहुतांश कॅप्सूल या जिलेटिनच्या आवरणाने बनलेले असते. हे आवरण मांसाहारामध्ये येत असते. त्यामुळे कॅप्सूलमधील घटक हे शाकाहारी असले तरी बहुतांश कॅप्सूलचे आवरण हे जिलेटिनचे असते. त्यामुळे ती कॅप्सूल शाकाहारमध्ये मोडत नाही. परंतु डॉक्टर जेव्हा रुग्णाला औषधे लिहून देतो त्यावेळी रुग्णाचे आरोग्य अबाधित राखणे आणि त्याचा जीव वाचवणे हा त्यामागील मूळ उद्देश असतो.

- Advertisement -

ते औषध शाकाहार किंवा मांसाहार प्रकार मोडणारे आहे हे त्याच्यासाठी महत्त्वाचे नसते. त्यामुळे औषधांवर लाल किंवा हिरवे चिन्ह लावून औषध शाकाहार किंवा मांसाहारी आहे. हे स्पष्टपणे दर्शवल्यास बहुतांश रुग्णांकडून ते औषध स्वीकारले जाऊ शकत नाही. रुग्णांनी औषध न घेणे हे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य नसल्याने औषधाच्या पॅकिंगवर शाकाहार किंवा मांसाहार हे चिन्हांकित करणे योग्य नसल्याचे मत तज्ज्ञ समितीने मांडले. तज्ज्ञ समितीने दिलेल्या अहवालानुसार औषध नियंत्रक सल्लागार मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत औषधांचे पॅकिंग चिन्हांकित न करण्याचे निर्देश मंडळाने औषध कंपन्यांना दिले आहेत.

औषधांच्या पॅकिंगवर शाकाहार किंवा मांसाहार चिन्हांकित करण्यासंदर्भातील अभ्यास करण्याचे निर्देश आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने औषध नियंत्रक सल्लागार मंडळाला दिले होते. त्यानुसार मंडळाने वैकल्पिक औषधांची उपलब्धता आणि शास्त्रीय पुरावे विचारात घेण्यासाठी प्रा. सी. के. कोकाटे यांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञांची समिती नेमली होती. या समितीने सर्व औषधांचा सविस्तर अभ्यास करण्यासाठी आणि सार्वजनिक आरोग्यावर परिणाम न करता शाकाहारी किंवा मांसाहार चिन्हांकित करणे लागू केले जाऊ शकते का? याचा अभ्यास केला. त्यासाठी सर्वसाधारण औषधे, जीव वाचवणारी औषधे यांची यादी तयार करून सर्व शक्यतांची पडताळणी करून औषधांच्या पॅकिंगवर शाकाहार किंवा मांसाहार हे चिन्हांकित करणे रुग्णांच्या हिताच्या दृष्टीने योग्य नसल्याचे मत तज्ज्ञ समितीने मांडले.

- Advertisement -

औषधांवर स्थानिक भाषेत माहिती नसणार
औषधांमधील घटकांची माहिती इंग्रजीसह स्थानिक भाषेमध्ये देण्यात यावी, अशी मागणी रुग्णांकडून होत होती. जेणेकरून रुग्णांना औषधांमधील घटक समजणे सोपे होणार होते. मात्र, अनेक औषधांचा आकार कमी असल्याने त्यावर दोन्ही भाषेत माहिती देणे शक्य नाही. तसेच औषधांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्यानंतर त्याचा पुरवठा राज्यनिहाय केला जातो. त्यामुळे स्थानिक भाषेचे लेबल लावणे शक्य नसल्याचे मत समितीने नोंदवले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -