घरताज्या घडामोडीलग्न समारंभांवर पुन्हा लक्ष

लग्न समारंभांवर पुन्हा लक्ष

Subscribe

कोरोनाचे नियम पाळा अन्यथा कारवाईला सामोरे जा

‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत लॉकडाउनमधून शिथीलता देण्यात आल्यानंतर जणू काही कोरोना संपलाच अशा अर्विभावात नागरीक वावरू लागले आहेत. लग्न समारंभांतील उपस्थितीबाबत नियमावली ठरवून दिलेली असतांनाही आता हजारोंच्या संख्येने लग्न समारंभ साजरे होऊ लागले आहेत. मात्र राज्यात पुन्हा एकदा कोरोना रूग्णांची संख्या वाढू लागल्याने आता या लग्न समारंभ पुन्हा एकदा ‘लक्ष’ करण्यात आले आहेत. कोरोना नियमावलीची अंमलबजावणी न करणार्‍या मंगल कार्यालये, लॉन्स, बँक्वेट हॉलवर पथकाव्दारे ‘वॉच’ ठेवण्यात येणार असून नियमांचे उल्लंघन होत असल्यास कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.

कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे चर्चा केली. राज्यातील १५ जिल्हयांमध्ये कोरोना रूग्णसंख्या वाढत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. अर्थात राज्याच्या तुलनेत नाशिकची स्थिती चांगली आहे. मात्र असे असले तरी, गाफील राहून चालणार नाही असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले. याकरीता काही निर्णय घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष करून कोरोनामुळे इतके दिवस थांबलेले लग्न समारंभ सुरू झाले आहे, लोकांच्या गाठीभेठी इतर कार्यक्रमांमध्ये कोरोना नियमावलीचे सर्रास उल्लंघन होतांना दिसून येते. त्यामुळे आता पथकामार्फत लग्न समारंभावर ‘वॉच’ ठेवण्यात येणार आहे. या कार्यक्रमांमध्ये गर्दीचे तसेच कोरोनाचे नियमभंग होतांना आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे. सर्व व्यवहार सुरू झाल्याने जणू काही कोरोना संपला अशा पध्दतीने नागरीक मास्क न घालता बाहेर पडतांना दिसून येतात अशा नागरीकांवरही कठोर कारवाईसाठी पाउलं उचलली जाणार असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले. तसेच गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाला याबैठकीत आदेशित करण्यात आले.

- Advertisement -

राज्यातील १५ जिल्हयांमध्ये कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. नाशिकमध्ये परिस्थिती नियंत्रणात असली तरी, खबरदारी म्हणून काही पावलं उचलणं आवश्यक आहे. याकरिता विविध पथकामार्फत कोरोना निर्बंधांचे पालन केले जाते की नाही यावर वॉच ठेवण्यात येउन निर्बंधांचे उल्लंघन केले जात असल्यास कठोर कारवाई केली जाईल. विशेषतः लग्न समारंभ, बँक्वेट हॉल, लॉन्स येथे साजरे केल्या जाणार्‍या लग्न सोहळयांवर पथकामार्फत वॉच ठेवण्यात येणार असून नियमांचे उल्लंघन होत असल्यास कठोर कारवाई केली जाईल. आजच्या बैठकित प्रत्येक विभागाला कारवाईबाबतचे निर्देश देण्यात आले आहेत.
सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

बैठकीतील महत्वाचे निर्णय
* लोक मास्क वापर करत नसल्यास दंडात्मक कारवाई करा.
* एकेका रुग्णांचे किमान 20 तरी संपर्क शोधलेच पाहिजेत
* जिथे कंटेनमेंट आवश्यक आहे तिथे ते करा व त्याची अंमलबजावणी करा
* लग्नसमारंभात नियम पाळले जात नसल्यास कारवाई करा.
* ज्या विवाह किंवा इतर समारंभात मास्क व इतर नियम पाळलेले दिसणार नाहीत त्या हॉल्स किंवा सभागृहांवर परवाने रद्द करा.
* हॉटेल्स, उपाहारगृहे यांना वेळा वाढवून दिल्या आगेत मात्र नियम पाळत नसतील तर लगेच कडक कारवाई करा

Manish Katariahttps://www.mymahanagar.com/author/kmanish/
गेल्या १७ वर्ष पत्रकारितेत. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. राजकीय, प्रशासकीय मुद्यांवर वृत्तांकन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -