Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर उत्तर महाराष्ट्र कर्जाचा हप्ता भरण्यासाठी दोन हजारांच्या नोटा स्वीकारायला नकार: मुथूट फायनान्स मधील प्रकार

कर्जाचा हप्ता भरण्यासाठी दोन हजारांच्या नोटा स्वीकारायला नकार: मुथूट फायनान्स मधील प्रकार

Subscribe

नाशिक : रिझर्व्ह बँकेने दोन हजारांची नोट ३० सप्टेंबर पर्यंत अधिकृतरित्या चलन म्हणून ग्राहय धरण्यात येईल असा निर्णय देवूनही अनेक बँकाकडून या नोटा स्विकारण्यास नकार देण्यात येत असल्याचे समोर येत आहे. नाशिकमधील मुथुट फायनान्स या वित्तीय संस्थेत कर्जाचा हप्ता भरण्यासाठी दोन हजार रूपयांची नोट देणार्‍या ग्राहकाला ही नोटच नाकारण्यात आली. बँकेकडूनच तसे आदेश असल्याचे यावेळी व्यवस्थापकांनी सांगितल्याने वाद निर्माण झाला.

दोन हजार रूपयांची नोट जरी बंद करण्याचा निर्णय झाला असला तरी याकरीता ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. तोपर्यंत ही नोट लिगल टेंडर म्हणून चलनात असल्याचा निर्वाळा आरबीआयने दिला आहे. ज्या ग्राहकांकडे दोन हजारांच्या नोटा असतील ते बँकेत जाउन नोटा बदलू शकतात किंवा आपल्या खात्यात या नोटांचा भरणा करू शकतात असे आरबीआयने म्हटले आहे. मात्र अनेक बँकांनी आपल्या सोयीनूसार नियमावली तयार करत आरबीआयच्या नियमांना फाटा देत ग्राहकांना वेठीस धरत असल्याचे दिसून येते. मुथुट फायनान्सच्या सावरकर नगर शाखेत आपल्या कर्जाचा भरणा करण्यासाठी गेलेल्या ग्राहकाकडून ही नोट स्विकारण्यास तेथील कर्मचार्‍यांनी नकार दिला.

- Advertisement -

याबाबत बँक व्यवस्थापक महेश मिश्रा यांना विचारले असता आम्हाला वरिष्ठ अधिकार्‍यांकडूनच याबाबत ऑर्डर असल्याचे त्यांनी सांगितले. संबधित ग्राहकाने नोटा न स्विकारण्याबाबत लेखी द्यावे अशी मागणी केली मात्र तसे देता येणार नाही असे सांगत नोटा स्विकारण्यास नकार दिला. शहरातील अनेक बँकांकडून असाच काहीसा त्रास ग्राहकांना सहन करावा लागत आहे. दोन दिवसांपूर्वीच पेट्रोल पंप चालकाकडूनही बँकेने दोन हजारांचा नोटांचा भरणा करून घेण्यास नकार दिला. मुळात आरबीआयच्या सूचनेनूसार बँकांनी दोन हजाराच्या नोटा स्विकारणे बंधनकारक असतांना बँकाकडून मात्र नोटा स्विकारण्यास नकार दिला जात असल्याने अशा बँकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

काय आहे नियम

बँकांनी नोटा स्विकारण्यास किंवा बदलण्यास नकार दिला तर बँकेच्या तक्रार विभागात तक्रार करून शकता. जर तक्रार दाखल करून ३० दिवसांमध्ये बँकेने उत्तर किंवा तोडगा काढला नाही तर तुम्ही रिझर्व्ह बँकेच्या इटिग्रेटे ओम्बुडस्मन योजना (आरबी -आयओएस) २०२१ नुसार तक्रार दाखल करू शकता. ती रिझर्व्ह बँकेच्या cm.rbi.org.in या पोर्टलवर करता येईल.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -