Sunday, May 16, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी रेमडेसिवीर एकमेव उपचार नाही, योग्य पद्धतीने उपचार केल्यास रुग्ण लवकर बरा होतो...

रेमडेसिवीर एकमेव उपचार नाही, योग्य पद्धतीने उपचार केल्यास रुग्ण लवकर बरा होतो – रोहित पवार

रेमडेसिवीर निर्यात तसेच भारताबाहेरील लसींना मान्यता देण्याबाबतीत जी दिरंगाई झाली ती आपल्या देशाला परवडणारी नाही.

Related Story

- Advertisement -

वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. त्यातच रुग्णांना बेड,आयसीयू बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली आहे. कोरोनाबाधित रुग्णाला लवकर बरे करण्यासाठी वापरात येणारे रेमडेसिवीर इंजेक्शन मोठ्या प्रमाणात वापरले जात आहे. रेमडेसिवीर हा एकमेव उपचार असल्याचा समज तयार झाल्याने रेमडेसिवीर ची मागणी प्रचंड वाढली आणि मोठ्या प्रामाणात मागणी वाढल्याने मागील काळात रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झाला. परंतु याबाबत वैद्यक तज्ज्ञांचं मत जाणून घेतलं असता केवळ रेमडेसिवीर हा एकच उपाय नसल्याचं त्यांचं मत आहे. ऑक्सिजन थेरपी, विटामिन, स्टेरॉइड, ब्लड थिनर्सची एकत्रितपाने योग्य पद्धतीने उपचार केल्यास रुग्ण लवकर बरा होत असल्याचे निरीक्षण ‘कोविड टास्क फोर्स’मधील डॉक्टरांनीही नोंदवले असल्याचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.

माझ्या मतदार संघात जामखेडमध्येही आरोळे हॉस्पिटलच्या कोविड सेंटरमधील डॉक्टरांनी स्वतंत्र उपचार पद्धती राबवत रेमडेसिवीर या महागड्या औषधाचा कमीत कमी वापर करत ३७०० रुग्णांना बरं केलं. ह्या उपचार पद्धतीची माहिती मी आरोग्य मंत्री राजेश टोपे साहेबांच्या माध्यमातून ‘महाराष्ट्र कोव्हीड टास्क फोर्स’पर्यंत पोचवलीय. मला वाटतं या उपचार पद्धतीबाबत अधिक संशोधन करून एक मॉडेल उपचार पद्धती संपूर्ण राज्यभरासाठी राबवता येईल का, याबाबत तज्ज्ञांनी विचार करायला हवा.

- Advertisement -

काल-परवा पर्यंत केवळ महाराष्ट्रात रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत होती परंतु आज उत्तरप्रदेश, गुजरात, बिहार, पश्चिम बंगालसह अनेक राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढतेय, परिणामी औषध पुरवठा, मेडिकल इक्वीपमेंट, आरोग्य व्यवस्थेवरील ताण प्रचंड वाढतोय. यामुळं आपल्याला खूप सूक्ष्म नियोजन करावं लागणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारने ICMR च्या माध्यमातून पर्यायी उपचार पद्धतीबद्दल त्वरित कार्यवाही करावी असा सल्ला रोहित पवारांनी दिला आहे.

योग्य वेळी योग्य पावलं उचलणं गरजेचे असून उशीर झाल्यास सामान्य जनतेला गंभीर परिणाम भोगावे लागतात. रेमडेसिवीर निर्यात तसेच भारताबाहेरील लसींना मान्यता देण्याबाबतीत जी दिरंगाई झाली ती आपल्या देशाला परवडणारी नाही. आजपर्यंत चुका कुणी काय केल्या याची उजळणी करण्यापेक्षा यापुढं चुका होणार नाहीत, याची काळजी सर्वांनीच घ्यावी आणि कोरोनाच्या महामारीतून देशाला बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत असे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.

- Advertisement -