Maharashtra Assembly Budget 2023 | मुंबई – भाजपा आमदार नितेश राणे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यातील वैर संपूर्ण महाराष्ट्राला ठावूक आहे. त्यांच्यातील युद्ध दिवसेंदिवस तीव्र होत असतानाच नितेश राणे यांनी संजय राऊतांना थेट आव्हानच केलं आहे. “संजय राऊतांना पोलीस संरक्षण आहे. त्यामुळे त्यांचं फक्त दहा मिनिटे संरक्षण काढा, परत उद्या सकाळी ते दिसणार नाहीत, एवढा शब्द देतो,” असं नितेश राणे आज म्हणाले.
विधिमंडळातील अर्थसंकल्पीय अधिवशेनाचा आज तिसरा दिवस असून आजचे कामकाज वादळी ठरले. संजय राऊतांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी सभागृहात राडा केला. अखेर, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सभागृह स्थगित करावे लागले. दरम्यान, आपले मत मांडताना नितेश राणे यांची जीभ घसरली आणि त्यांनी राऊतांना थेट जीवे मारण्याची धमकी दिली.
हेही वाचा – संजय राऊत हक्कभंगप्रकरणी सभागृहात राडा, विधिमंडळाचे दोन्ही सभागृह स्थगित
नितेश राणे म्हणाले की, संजय राऊतांचं रोज सकाळी बसून आपल्याला ऐकावं लागतं. महाराष्ट्राला याची गरज आहे का? काय घेऊन खाललं आहे यांचं? त्याचा आणि शिवसेनेचा काय संबंध. ते शिवसेनेत आले कधी? सामनात लिहिण्याआधी ते लोकप्रभामध्ये असायचे. त्यावेळेस त्यांचे शिवेसनेविरोधात लेख असायचे. या संजय राऊतांची एवढी हिंमत झालेली की त्यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंविरोधात लिहिलं होतं. शिवसेनेविरोधात लिहिलं. बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या पत्नीचं पटत नाही, असंही त्यांनी लिहिलं. त्यामुळे त्यांचं पहिलं संरक्षण काढा. पोलिसांचं संरक्षण घेऊन फिरतात ते. सरकारने दिलेलं संरक्षण आहे. त्याचं दहा मिनिटे संरक्षण काढा, परत उद्या सकाळी ते दिसणार नाही एवढा शब्द देतो.
सभागृह स्थगिती झाल्यानंतर नितेश राणे यांनी बाहेर येऊन प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “ज्याची ग्रामपंचायतीत निवडून येण्याची लायकी नाही. इतरांच्या मतांवर ते खासदार झालेले आहेत. ते नालायक संजय राऊतयांच्यावर हक्कभंगाची कारवाई करावी अशी एकमुखी मागणी केली. बिनपैशांचा वाजणारा भोंगा एकदाच कसा बंद करता येईल यावर उपचार झाला पाहिजे, संशोधन झाला पाहिजे. संजय राऊत महाराष्ट्र सरकारचं संरक्षण घेऊन फिरतात. पोलीस घेऊन फिरतात. पोलिसांचं संरक्षण घेऊन कोणीही घाबरवू शकतं. पोलिसांचं संरक्षण २४ तासं सोडावं मग कुठे कुठे झंडूबाम लावावा हे त्यांनाही कळेल. संजय राऊत ना बाळासाहेबांचे झाले नाही, नाही शरद पवारांचे झाले. त्यामुळे आमच्या विधिमंडळ सदस्यांची विनंती आहे की त्यांना सभागृहात शिक्षा द्यावी, मग त्यांना आमच्याकडे सोपवावं, आम्ही त्यांची काय मिरवणूक काढायची ती काढू.”
दरम्यान, संजय राऊतांनी विधिमंडळ सदस्यांना चोरमंडळ संबोधल्याने विधान सभा आणि विधान परिषदेत आज तुफान गोंधळ झाला. कामकाज सुरू होताच विधान सभेत आशिष शेलार आणि अतुळ भातखळकर यांनी त्यांच्याविरोधात हक्कभंग आणण्याची मागणी केली. विधान परिषदेतही यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेतली. यामुळे विधान सभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. संजय राऊतांच्या वक्तव्याची पडताळणी हक्कभंग समितीकडून केली जाईल. त्यानंतर, ८ मार्चला याबाबत निर्णय जाहीर केला जाईल, असं नार्वेकरांनी स्पष्ट केलं.