Raigad Fort : रायगड किल्ल्यावरील वीज यंत्रणेचे नूतनीकरण

रायगड जिल्हा नियोजन समितीमार्फत रु. 6.04 कोटीचा निधी या कामासाठी उपलब्ध करून देण्यात आला होता. या कामाचा कार्यादेश दिनांक 5 मार्च 2020 रोजी देण्यात आला होता.

Renovation of power system at Raigad Fort
Raigad Fort : रायगड किल्ल्यावरील वीज यंत्रणेचे नूतनीकरण

शिवछत्रपतींची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावरील जुन्या व जीर्ण विद्युत वाहिन्या बदलून वीज वितरण यंत्रणेचे सक्षमीकरण करण्याचे अतिशय अवघड कार्य महावितरणच्या माध्यमातून राज्य सरकारने पार पाडले असून यामुळे रायगड किल्ला रात्रीही प्रकाशमान होणार असल्याची माहिती राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज विधानसभेत एका निवेदनाद्वारे दिली. राज्यभरात आज तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जात असताना ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिलेली माहिती म्हणजे शिवजयंतीनिमित्त राज्याला एक अनोखी भेट मानली जात आहे.

“रायगड जिल्हा नियोजन समितीमार्फत रु. 6.04 कोटीचा निधी या कामासाठी उपलब्ध करून देण्यात आला होता. या कामाचा कार्यादेश दिनांक 5 मार्च 2020 रोजी देण्यात आला होता. महावितरणचे अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदार यांनी हे अतिशय आव्हानात्मक व कठीण काम शिवकार्य म्हणून एकजुटीने व आत्मीयतेने पूर्णत्वास नेले,” याबद्दल या सर्वांचे ऊर्जामंत्री राऊत यांनी अभिनंदन केले आहे. रायगड किल्ल्यातील हे काम प्राधान्याने आणि उत्कृष्टपणे पार पडावे म्हणून स्वतः ऊर्जामंत्री या कामावर लक्ष ठेवून होते.

रायगड किल्याला सद्यस्थितीत 22 केव्ही कलोशे उपकेंद्रामार्फत, 22 केव्ही पाचाड वाहिनीद्वारे वीजपुरवठा करण्यात येतो. रायगड किल्ला कलोशे उपकेंद्रापासून 15 किमी आहे. रायगड किल्ल्याची समुद्र सपाटीपासूनची उंची अंदाजे 2850 फूट इतकी आहे. वीज कर्मचारी व कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांनी कोरोनाच्या काळात अवघड भौगोलिक परिस्थितीचा सामना करुन आवश्यक भूमिगत केबल (वजन अंदाजे 515 किलो) व 4 वितरण रोहित्र (वजन अंदाजे 734 किलो प्रत्येकी) हाताने ओढत व खांदयावर भार घेऊन सदर साहित्य गडावर पोचवण्यात आले याबद्दल डॉ. राऊत यांनी महावितरणचे अधिकारी कर्मचारी व हे काम करणाऱ्या कंत्राटदाराकडे कार्यरत संबंधितांचे मंत्री डॉ.राऊत यांनी कौतूक केले.
सदर योजनेमध्ये गडावर नविन 4 वितरण रोहित्रे, 2 कि.मी. उच्चदाब वाहिनी, 3.05 कि.मी. लघुदाब तारमार्ग वाहिन्यांचे भूमिगत वाहिन्यांमध्ये रूपांतर व 2.5 कि.मी. लघुदाब वाहिनी इत्यादी कामे पूर्ण झाली असून उर्वरीत कामे मार्च 2022 मध्ये पूर्ण करण्याचे नियोजित आहे.

रायगडावर सुरक्षित आडोशाच्या ठिकाणी ४ वितरण रोहित्रे बसविण्यात आली असून भूमिगत वीज वाहिन्यांमार्फत वीज वितरण करण्यात येत असल्याने याचा रायगडाच्या सौदर्यांवर कोणतीही परिणाम होणार नाही, याची पूर्णपणे काळजी घेण्यात आली आहे. कोकणातील व प्रामुख्याने गडावर कोसळणारा मुसळधार पाऊस व वारे यामुळे सुरक्षितता व टिकाऊपणाच्या दृष्टीने विद्युत वाहिन्या भूमिगत करण्यात आल्या आहेत.

डॉ. आंबेडकरांनीही दिली होती भेट

“महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह आटोपल्यावर सन १९२७ डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रायगड किल्ल्यास ऐतिहासिक भेट दिली. रस्ता नव्हता म्हणून नाते ते पार्थर्डी पर्यंत बाबासाहेब पायी चालत गेले. बॅरिस्टर झालेली ते पहिलीच व्यक्ती जिने पायी रायगड गाठला. यावेळी उपस्थित सर्व लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो,अशा घोषणा देत होते,” अशी आठवणही त्यांनी सभागृहात सांगितली.


हेही वाचा – शिवाजी महाराजांच्या जयंतीचा वाद नको; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपला सुनावले