घरमनोरंजनविक्रम गोखले यांच्या निधनाचे वृत्त खोटे, पत्नी वृषाली गोखलेंनी दिली माहिती

विक्रम गोखले यांच्या निधनाचे वृत्त खोटे, पत्नी वृषाली गोखलेंनी दिली माहिती

Subscribe

पुणे – मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले गेल्या १९ दिवसांपासून पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेत आहेत. मात्र, काल बुधवार सायंकाळपासून त्यांच्या निधनाच्या अफवा समाजमाध्यमांवर पसरल्या आहेत. विक्रम गोखले यांचं निधन झाल्याचे वृत्त खोटं असल्याची प्रतिक्रिया विक्रम गोखले यांच्या पत्नी वृषाली गोखले यांनी ई-टाइम्सला दिली आहे.

वृषाली गोखले म्हणाल्या की, ‘काल दुपारी विक्रम गोखले कोमात गेले. ते सध्या व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांची प्रकृती वरखाली होत आहे. पुढे काय करायचं हे डॉक्टर ठरवतील. मात्र, त्यांच्या निधनाचे वृत्त खोटे आहे.’

- Advertisement -

‘विक्रम गोखले ५ नोव्हेंबरपासून पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या प्रकृतीत थोडी सुधारणा झाली होती, मात्र आता पुन्हा प्रकृती बिघडली आहे. त्यांना हृदय आणि मूत्रपिंडासारख्या अनेक समस्या होत्या. तसंच, सध्या त्यांना मल्टि ऑर्गन फेल्युअर झाले आहे,’ असंही त्यांनी स्पष्ट केलं.


विक्रम गोखले यांचं वय ७७ आहे, मात्र सगळीकडे ८२ सांगण्यात येतंय, असंही त्यांनी पुढे स्पष्ट केलं. माझी मुलगी सॅन फ्रान्सिस्कोमधून आली आहे. दुसरी मुलगी मुंबईत राहतेय, तीही पुण्यात आली आहे, असंही वृषाली गोखले म्हणाल्या.

- Advertisement -

विक्रम गोखले लॉकडाऊन काळात मुंबईतून पुण्यात स्थायिक झाले होते. पुण्यातच राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता. त्यामुळे ते क्वचितच मुंबईत येत असत, अशी माहिती त्यांच्या एका मित्राने दिली.

दरम्यान, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती खालवली असल्याने अनेकांनी चिंता आणि काळजी व्यक्त केली आहे. मात्र, असं असताना अनेकांनी समाज माध्यमांवर त्यांच्या निधनाची बातमी प्रसिद्ध करून श्रद्धांजली अर्पण केली आहे. बॉलिवूड अभिनेता अजय देवगण यानेही काल रात्री त्यांच्या निधनाची बातमी ट्विट केली. तसंच, राज्य सरकारच्या अधिकृत महाराष्ट्र परिचय केंद्रच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरूनही गोखले यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला होता. त्यामुळे निधनाचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले.

परंतु, विक्रम गोखले यांच्या निधनाचे वृत्त त्यांच्या पत्नी वृषाली गोखले आणि मुलीने फेटाळून लावले आहे. ते सध्या व्हेटिंलेटरवर असून डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार घेत आहेत. मात्र, त्यांच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -