घरमहाराष्ट्रनागपूरच्या संघ मुख्यालयात इफ्तार पार्टीच्या आयोजनाला संघाचा नकार

नागपूरच्या संघ मुख्यालयात इफ्तार पार्टीच्या आयोजनाला संघाचा नकार

Subscribe

राष्ट्रीय मुस्लिम मंच ही संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न आहे. रमजान ईदच्या निमित्ताने मंचाच्या महाराष्ट्र विभागाने मुंबईत इफ्तार पार्टीचे आयोजन केले. याचप्रकारे नागपुरमधील संघाच्या मुख्यालयातही इफ्तार पार्टीचे आयोजन करण्याची विनंती मुस्लिम मंचचे प्रदेश संयोजक मोहम्मद फारुख शेख यांनी केली होती. त्यांच्या या मागणीनंतर बराच वाद निर्माण झाल्याने संघाने शेख यांच्या विनंतीस नकार दिला आहे.

इस्लाम कुणालाही इफ्तार आयोजित करण्याचे सांगत नाही – मोहम्मद अफजल
राष्ट्रीय मुस्लिम मंचने शेख यांच्या विनंतीवर आता स्पष्टीकरण दिले आहे. राष्ट्रीय अध्यक्ष मोहम्मद अफजल यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, “इस्लाम कोणालाही मुस्लिम व्यक्तींसाठी पार्टी आयोजित करण्यास सांगत नाही. त्यामुळेच राष्ट्रीय मुस्लिम मंचाच्या महाराष्ट्र विभागाच्या नेत्यानं केलेल्या विनंतीमध्येच त्रुटी आहेत.”

- Advertisement -

अफजल पुढे म्हणाले की, “महाराष्ट्र विभागाकडून मुंबईमध्ये पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातच आणखी एका इफ्तार पार्टीचे आयोजन करता येणार नाही. तसेच एखाद्या मुस्लिम बांधवास स्वतःहून इफ्तार पार्टीचे आयोजन करायची इच्छा असेल तर त्याने ते करावे. यासाठी दुसऱ्याला आयोजन करण्यास सांगू नये.”

इफ्तार पार्टीवरुन वाद
प्रदेश संयोजक मोहम्मद फारुख शेख यांनी नागपूर महानगरचे संघचालक राजेश लोया इफ्तार पार्टीचे आयोजन करण्याची विनंती केली होती. ही इफ्तार पार्टी नागपूरच्या संघ मुख्यालयातील स्मृती मंदीर परिसरात आयोजित करण्याची विनंती शेख यांनी केली होती. त्यामुळे यावर मोठा वाद झाला होता. त्यानंतर संघाकडून संघाच्या मुख्यालयात पार्टीचे आयोजन होऊ शकत नाही, असे उत्तर शेख यांना देण्यात आले.

- Advertisement -

मोहम्मद फारुख शेख नाराज
इफ्तार पार्टीला संघाने नकार दिल्यानंतर मोहम्मद फारुख शेख यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, “या इफ्तार पार्टीतून बंधूभावाचा संदेश जाईल, असे मला वाटले होते. भारतात असहिष्णूता असल्याची चर्चा जगात आहे. त्या पार्श्वभूमीवर अशा पार्टीचे आयोजन करण्यात गैर काय? गेल्या वर्षी आम्ही मोमिनपुरातील जामा मशिदीसमोर इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. त्या पार्टीत संघ आणि भाजपचे नेते सहभागी झाले होते.” यावर संघाचे वरिष्ठ पदाधिकारी यांनी सांगितले की, “स्मृती मंदीर परिसरात प्रशिक्षण सुरु आहे, त्यामुळे तिथे पार्टीचे आयोजन करता येणार नाही.”

Chetan Patilhttps://www.mymahanagar.com/author/chetan/
writer, poet, journalist, copy writer, theater artist
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -