विजयदुर्गच्या समुद्रात अडकलेल्या १९ जणांची तटरक्षक दलाच्या जवानांकडून सुटका

विजयदुर्गच्या समुद्रात अडकलेल्या १९ जणांची तटरक्षक दलाच्या जवानांकडून सुटका करण्यात आली आहे. वादळी वाऱ्यात अडकलेल्या एका व्यावसायिक जहाजातून १८ भारतीय आणि एका इथियोपियन नागरिकाला वाचवण्यात भारतीय तटरक्षक दलाला यश आले आहे.

मोटार टँकर पार्थ, गॅबॉन हे जहाज विजयदुर्गच्या किनार्‍यापासून सुमारे ४१ किमी अंतरात पश्चिमेला समुद्रात अडकले होते. हे जहाज यूएईच्या खोर फक्कन येथून न्यू मंगलोरला जात होते. मात्र, वादळी वाऱ्यामुळे या जहाजाचा अपघात झाल्याने हे जहाज बुडण्याच्या अवस्थेत होते. परंतु सुरक्षा बोटीच्या साह्याने हे जहाज सोडून १९ जणांनी मदतीसाठी बचाव संदेश पाठवले. त्यानंतर भारतीय तटरक्षक दलाने ICGS सुजीत आणि ICGS अपूर्व या तटरक्षक दलाची दोन जहाजे अपघातग्रस्त जहाजाकडे वळवली. त्यामुळे या जहाजातील तब्बल १९ जणांना वाचवण्यात यश आले आहे.

अॅस्फाल्ट बिटुमेन ३९११ एमटी या मालाची वाहतूक हे जहाज करत होते. परंतु वादळी वाऱ्यात हे जहाज अडकल्याने जहाजातील पाण्याच्या गिट्टीच्या टाक्यांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे हे जहाज बुडण्याची शक्यता असल्याने जहाजातील सुरक्षा बोटीच्या साह्याने खलाशांनी भारतीय तटरक्षक दलाला मदतीचे संदेश पाठवले. त्यानुसार तटरक्षक दलाच्या जवानांनी त्यांचे प्राण वाचवले.

याबाबत देवगड पोलीस स्टेशन निरीक्षक निळकंठ बगळे यांनी माहीती दिली आहे. आज सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. सदर तेलवाहू जहाज दुबईहून बेंगलोरला जात होते मात्र तळाला भोक पडल्याने विजयदुर्ग किनाऱ्यापासून चाळीस वावात हे जहाज बुडू लागले. तात्काळ जहाजावरील कर्मचाऱ्यांनी तटरक्षक दलाशी संपर्क केला व तदनंतर रत्नागिरी येथील तटरक्षक दलाने येऊन या जहाजावरील 19 कर्मचाऱ्यांना वाचवले आहे. हवामान खराब असल्याने रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अनेक अडचणी आल्या मात्र सर्व कर्मचारी सुखरूप आहेत.


हेही वाचा : पत्राचाळ घोटाळा प्रकरण : संजय राऊतांच्या जामिनाला ईडीचा विरोध