बाहेरून आलेल्यांना रिझर्व्हेशन आणि निष्ठावंतांची घुसमट, काँग्रेसची भाजपावर टीका

Sachin Sawant on BJP | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करेक्ट कार्यक्रम करून काँग्रेसविरोधात रणनीती आखल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. त्यामुळे काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी भाजपावर टीकास्त्र डागलं आहे.

sachin sawant

Sachin Sawant on BJP | मुंबई – नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरून काँग्रेसमध्ये मोठा धमाका झाला आहे. काँग्रेसमध्ये असलेला वाद चव्हाट्यावर आला असून युवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे भाजपाच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे. मात्र, असं असतानाच काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपावर सडकून टीका केली आहे. इतर पक्षांतून आलेल्यांना रिझर्व्हेशन मिळत असेल तर पक्षातील निष्ठावंतांची घुसमट भयंकर वाढली असणार हे नक्की, असं सचिन सावंत म्हणाले आहेत.

हेही वाचा पंकजा मुंडे शिवसेनेत जाण्याच्या चर्चेबद्दल विखे-पाटील म्हणाले, पक्षाच्या दृष्टीने…

नाशिकमध्ये पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. डॉ. सुधीर तांबेंना काँग्रेसने उमेदवारी दिलेली असताना त्यांनी ती मागे घेतली. त्याजागी सत्यजित तांबे यांना उमेदवारी दिली. ही उमेदवारी देताना काँग्रेसच्या नेत्यांना विश्वासात घेण्यात आले नव्हते असा दावा केला जातोय. तसंच, सत्यजित तांबे यांनी काँग्रेसमधून अर्ज न भरता अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने सत्यजित तांबेंनी अपक्ष अर्ज भरल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं. दुसरीकडे तांबेंनी पाठिंबा मागितला तर आम्ही द्यायला तयार आहोत, अशी भूमिका भाजपाने मांडली. त्यामुळे काँग्रेसने लागलीच तांबेंकडचा पाठिंबा काढून घेतला. दरम्यान, सत्यजित तांबे आता भाजपाच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे.

हेही वाचा – सत्यजित तांबेंना भाजपा पाठिंबा देणार का? फडणवीस म्हणाले, युवानेता म्हणून…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करेक्ट कार्यक्रम करून काँग्रेसविरोधात रणनीती आखल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. त्यामुळे काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी भाजपावर टीकास्त्र डागलं आहे.

साम दाम दंड भेदाच्या राजकारणातून भाजपा विरोधी पक्ष कमकुवत करण्यासाठी देशभर इतर पक्षातून मोठ्या प्रमाणात भरती करत आहे. इतकी की टपावर बसायलाही जागा नाही. काही बाहेरुन आलेल्यांना रिझर्व्हेशन मिळत असले तरी अनेकजण लटकलेलेच आहेत. परंतु निष्ठावंतांची घुसमट भयंकर वाढली असणार हे नक्की!, असं ट्वीट सचिन सावंत यांनी केलं आहे.