नाणारवरुन शिवसेनेत ठिणगी, शाखांप्रमुखांसह पदाधिकार्‍यांचे राजीनामे

oil-refinery-project
नाणार प्रकल्प

कोकणातल्या प्रस्तावित नाणार रिफायनरी प्रकल्पाला वाढता विरोध पाहून हा प्रकल्प स्थगित करण्याचा निर्णय तत्कालिन भाजप सरकारने घेतला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तेव्हा नाणारविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्री झाल्यानंतर देखील उद्धव ठाकरेंनी तीच भूमिका कायम ठेवली असताना शिवसेनेच्याच स्थानिक विभागप्रमुखाने नाणारला पाठिंबा असल्याची भूमिका जाहीर केली होती. उद्धव ठाकरेंनी त्याची दखल घेत सागवे येथील शिवसेना विभागप्रमुख राजा काजवे यांची पदावरून उचलबांगडी केली होती. त्यामुळे स्थानिक शिवसेना संघटनेमध्ये यावरून वादाची ठिणगी पडली असून शिवसेनेच्या २२ शाखाप्रमुखांनी राजीनामे दिले आहेत.

दोन पानी राजीनामापत्र
नाणार रिफायनरी प्रकल्पाला दिलेल्या पाठिंब्यामुळे पक्षाने सागवे येथील विभागप्रमुख राजा काजवे यांची उचलबांगडी केल्यानंतर त्याचे पडसाद कोकणात उमटू लागले आहेत. काजवे यांच्यावरील कारवाईचा विरोध करण्यासाठी पक्षाच्या स्थानिक शाखाप्रमुख आणि पदाधिकार्‍यांनी सामुहिक राजीनामे दिले आहेत. त्यामुळे ऐन निवडणूकीच्या तोंडावर ज्या नाणार प्रकल्पावरून रणकंदन सुरु होते त्यावरून पुन्हा एकदा ऐन होळीमध्ये रणकंदन माजणार आहे.

सागवे यांनी कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्पाला समर्थन दिल्यामुळे शिवसेनेने त्यांच्यावर कारवाई केली होती. त्यामुळेच कोकणातील सागवे यांच्यासह विभागातील तब्बल २२ शाखा प्रमुख, उपविभाग प्रमुख आणि पदाधिकार्‍यांनी पदाचे राजीनामे दिले आहेत. आपल्या दोन पानी राजीनामापत्रावर या सगळ्यांनी सह्या करून ते पक्षप्रमुखांकडे पाठवले आहे.

अवघ्या काही दिवसांपूर्वीच नाणार प्रकल्पाची एक जाहिरात शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या पहिल्या पानावर छापून आली होती. त्यामुळे शिवसेनेची नाणारबाबत नक्की भूमिका काय? यावरून संभ्रमाचं वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी नाणारला समर्थन देणार्‍या स्थानिक पदाधिकार्‍याची उचलबांगडी केल्याने शिवसेनेच्या भूमिकेबद्दल अजूनच चर्चा होऊ लागली. मात्र, आता स्थानिक पदाधिकार्‍यांच्या नाराजीचे नवे आव्हान शिवसेनेसमोर उभे ठाकले आहे.