महाराष्ट्र बंदला राहाता शहरात शंभर टक्के प्रतिसाद; तालुक्यात संमिश्र प्रतिसाद

साईभक्तांची गैरसोय टाळण्यासाठी शिर्डीत बंद नाही 

उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या वतीने आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला राहाता शहरात शंभर टक्के व तालुक्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला.

राहाता शहरातील व्यावसायिकांनी दुकाने शंभर टक्के बंद ठेवून उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. राहाता बाजारतळ येथे काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, संभाजी ब्रिगेड तसेच विविध शेतकरी संघटनांच्या वतीने निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी निवासी नायब तहसीलदार भांगरे व पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

यावेळी एकनाथ गोंदकर, राजेंद्र पठारे, धनंजय गाडेकर, नंदकुमार सदाफळ, मोहन सदाफळ, शशिकांत लोळगे, विजय मोगले, मुन्ना फिटर, दिपक सोळंकी, एल एम डांगे, लताताई पारधे, दशरथ गव्हाणे, समीर करमासे, राजेंद्र अग्रवाल, अमोल आरणे, प्रसाद महाले, नितीन सदाफळ आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिर्डीत बंद नाही 

शिर्डीत साई दर्शनासाठी देश विदेशातून साई भक्त येत असतात. साई भक्तांची गैरसोय टाळण्यासाठी शिर्डीत कुठल्याही राजकीय पक्षांनी बंद पाळायचा नाही असा निर्णय सर्व ग्रामस्थांनी अनेक वर्षांपूर्वी घेतलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्र बंदची हाक दिलेली असतानाही शिर्डीत या बंदचा कुठलाही परिणाम दिसला नाही. शिर्डीत सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरू होते.