अंगणवाडी, आरोग्यसेविकांवर ‘बेटी बचाओ..’ची जबाबदारी

सरकारी आणि खासगी हॉस्पिटलांतील गर्भवतींची नोंद होणार

‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’

पोलियो, डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा सामना करण्यासाठी आरोग्यसेविका व झोपडपट्टी व ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्यामध्ये अंगणवाडी सेविका महत्त्वाची भूमिका पार पाडतात. अंगणवाडी व आरोग्यसेविकांमुळे अनेक मोहिमा यशस्वी राबवण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता स्त्री भ्रुण हत्या रोखणे व मुलींच्या शिक्षणाची जबाबदारीही अंगणवाडी व आरोग्यसेविकांवर सोपवण्यात येणार आहे. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ मोहीम यशस्वी राबवण्यासाठी अंगणवाडी व आरोग्यसेविकांची मदत घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

ग्रामीण व शहरी भागात तळागळापर्यंत जाऊन आरोग्यसेविका नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील असतात. तसेच मुलांना शिक्षण व माध्यान्ह्य भोजन देण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविका प्रामाणिकपणे पार पाडतात. अंगणवाडी व आरोग्यसेविकांमुळे सरकारच्या अनेक मोहिमा यशस्वी झाल्या आहेत. त्यामुळे मुंबईमध्ये ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ मोहीम यशस्वी व्हावी यासाठी मुंबई जिल्हाधिकार्‍यांनी अंगणवाडी व आरोग्यसेविकांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्यसेविका प्रत्येक घरामध्ये जाऊन विविध मोहिमांची माहिती देत असल्याने त्यांना प्रत्येक घरातील परिस्थितीची माहिती असते याचा वापर करत आरोग्यसेविकांवर त्यांच्या विभागातील गर्भवतींची नोंद करण्याची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे.

यामध्ये त्यांना महापालिकेच्या आरोग्य विभाग किंवा खासगी दवाखान्यात तपासणीसाठी येणार्‍या गर्भवतींची विशेषत: पहिली व दुसरी मुलगी असणार्‍या स्त्रियांची त्यांच्या वस्तीस्थानासह नोंद होते का? किती महिलांनी तपासणी केली आहे? याची आकडेवारी गोळा करण्याची तसेच गर्भवती व त्यांच्या कुटुंबियांना स्त्री भ्रुण हत्या व मुलींच्या शिक्षणाची आवश्यकता पटवून सांगण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पालिका आरोग्य विभागामार्फत जननदराची सखोल माहिती जमा करण्याच्या सूचना जिल्हाधिकार्‍यांनी दिल्या आहेत. आरोग्य विभागासोबतच अंगणवाडी सेविकांचे सहकार्यही मोहिमेत महत्त्वाचे आहे. परिसरातील सार्वजनिक व खासगी मॅटर्निटी होमची यादी तयार करण्याचे काम त्यांच्यावर सोपवण्यात येणार आहे.

पोलिसांचीही मदत घेणार
स्त्री भ्रुण हत्येबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे. विशेषत: पालिका क्षेत्रातील झोपडपट्टी विभागात ज्यांना दोन मुली आहेत त्यांना समुपदेशन करावे यासाठी आरोग्य विभागासोबत पालिकेच्या महिला बाल कल्याण विभागाचेही सहकार्य घेण्यात येणार आहे. समुपदेशनादरम्यान अंगणवाडी व आरोग्यसेविकांना त्रास देण्याचा किंवा स्त्री भ्रुण हत्या रोखण्यासाठी आवश्यकता भासल्यास पोलिसांची मदतही घेण्यात येणार आहे.