आज मध्यरात्रीपासून निर्बंध कठोर

*लसीकरणाशिवाय महाराष्ट्रात प्रवेश बंद *रात्रीची संचारबंदी लागू * शाळा-कॉलेजेस १५ फेब्रुवारीपर्यंत बंद * पर्यटन स्थळ, मैदाने बंद*थिएटर ५० टक्के उपस्थिती * परीक्षार्थींना हॉल तिकिटावर प्रवास

india lockdown weekend curfew delhi karnataka imposed night curfew know other states update

राज्यातील कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचे गांभीर्य लक्षात घेऊन आणि रुग्णांच्या सातत्याने वाढणार्‍या संख्येची लक्षणे पाहून राज्यात नव्याने कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आरोग्य विभाग, टास्क फोर्स आणि इतर यंत्रणांबरोबरील बैठकीनंतर या निर्बंधांची घोषणा केली. राज्यात प्रवेश घेऊ पाहणार्‍यांना लसीचे दोन्ही डोस पूर्ण करणे बंधनकारक असेल. या व्यक्तीला आरटीपीसीआर अहवाल सादर करावा लागणार आहे.

राज्यात कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत असल्याचे चित्र आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ही नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीनुसार आता राज्यात 10 जानेवारीपासून रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात अत्यावश्यक सेवेशिवाय कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही. त्याचबरोबर शाळा, महाविद्यालये, मॉल, शॉपिंग मॉल, मैदाने, उद्याने, चित्रपटगृहे, केशकर्तनालय, सरकारी आणि खासगी कार्यालये आदींसाठी ही नियमावली लागू करण्यात आली आहे. महत्वाची बाब म्हणजे मुंबई लोकल प्रवासासाठी कुठलेही निर्बंध लावण्यात आलेले नाहीत.

नव्या नियमानुसार रात्रीची संचारबंदी ११ वाजता सुरू होऊन ती पहाटे ५ वाजेपर्यंत लागू राहील. राज्यातील पर्यटन स्थळेही बंद ठेवण्यात येतील. मैदानांवरील खेळांवरही बंदी घालण्यात आली आहे. राज्यातील महाविद्यालये आणि शाळा १५ फेब्रुवारीपर्यंत बंदच राहतील. नाट्य आणि चित्रपटगृहांमधील प्रेक्षकांची संख्या ५० टक्के इतक्या क्षमतेनेच सुरू राहतील. सलून आणि खासगी कार्यालयांमध्येही ५० टक्क्यांच्या उपस्थितीला मान्यता देण्यात आली आहे.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने प्रवास करणार्‍यांना लसीचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक आहे. ते न घेतलेल्यांना बसप्रवास वर्ज्य ठरवण्यात आला आहे. हॉटेल्स आणि रेस्टॉरंट रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवली जातील. येथेही दोन्ही डोस घेतलेल्यांनाच प्रवेश दिला जाईल. स्पा, स्वीमिंग पूल आणि व्यायामशाळा बंद ठेवण्यात येतील.

=रात्री 11 ते सकाळी 5 कर्फ्यू
=मैदाने, उद्याने पर्यटन स्थळ बंद
=शाळा, कॉलेज १५ फेब्रुवारीपर्यंत बंद
=थिएटर 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार
=सलून आणि खासगी कार्यालय 50 टक्के क्षमतेने सुरू
=लसीकरण झालेल्यांना सार्वजनिक बसने वाहतूक करण्यास मुभा
=हॉटेल रेस्टॉरंट फक्त रात्री 10 पर्यंत सुरू ठेवण्यास मुभा
=स्विमिंग पूल, स्पा, व्यायामशाळा पूर्णपणे बंद