घरमहाराष्ट्रमुंबई, ठाण्यातील निर्बंध शिथिल

मुंबई, ठाण्यातील निर्बंध शिथिल

Subscribe

लोकल प्रवासाचा दोन दिवसात निर्णय

राज्यातील ज्या 25 जिल्ह्यात कोरोनाचा पॉझिटीव्हीटी दर राज्याच्या सरासरीपेक्षा कमी आहे तेथील निर्बंधामध्ये शिथिलता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना निर्बंधातून सूट मिळालेल्या जिल्ह्यात मुंबई, मुंबई उपनगर, ठाण्यासह उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर वगळता सर्व जिल्ह्यांचा समावेश आहे. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या एक-दोन दिवसात होईल. दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंटना रात्री आठपर्यंत परवानगी देण्याचेही विचाराधीन आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्हे आणि कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर तर मराठवाड्यातील बीड या 11 जिल्ह्यांमधील परिस्थिती गंभीर असून तिथे तिसर्‍या टप्प्याच्या नियमानुसार निर्बंध कायम राहतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरूवारी दिली. मुंबईतील लोकलचा प्रवास सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याचा निर्णय एक ते दोन दिवसात होईल, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी कोविड टास्क फोर्सची बैठक घेतली. या बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती टोपे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. राज्यातील 25 जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती राज्याच्या सरासरीपेक्षा कमी आहे. तिथे सर्व निर्बंधांचे शिथिलीकरण करण्याचा निर्णय झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे यासंदर्भातील फाईल जाईल. त्यावर ते सही करतील. त्यानंतर एक दोन दिवसात ही शिथिलता देण्यात येणार आहे, असे टोपे यांनी सांगितले.

राज्यातील 11 जिल्ह्यातील करोनाची परिस्थिती गंभीर आहे. ही परिस्थिती अजून निवळलेली नाही. त्यामुळे हे 11 जिल्हे तिसर्‍या टप्प्यातच राहतील असेही त्यांनी सांगितले. राज्यातील इतर 25 जिल्ह्यांमध्ये पॉझिटीव्हीटी दर खूप कमी आहे. ज्या जिल्ह्यात वाढीचा दर कमी आहे, त्या ठिकाणी निर्बंध शिथिल करत असताना दुकाने संध्याकाळी चारऐवजी अधिक वेळ सुरू ठेवण्यास मुभा दिली जाऊ शकते, असेही ते म्हणाले.

- Advertisement -

सिनेमागृह आणि मॉलमधील कर्मचार्‍यांचे लसीकरण पूर्णपणे करून त्यानंतर ही ठिकाणे चालू ठेवण्यासंदर्भात चर्चा झाली. रेल्वे विभागाशी चर्चा करून लोकल सुरू करण्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील. लोकल प्रवासाबाबत पुढील एक ते दोन दिवसांत निर्णय येण्याची शक्यता आहे, असेही राजेश टोपे म्हणाले.

राज्यात कोरोनाची तिसरी लाट येईल तेव्हा येईल. पण राज्याची तिसर्‍या लाटेसाठी तयारी आहे का हे खूप महत्त्वाचे आहे. मात्र, संभाव्य तिसर्‍या लाटेसाठी आमची तयारी झाली आहे. या लाटेसंदर्भात जिल्हा, तालुका स्तरावरील सर्व अधिकार्‍यांना सूचना देण्यात आल्यात. सरकारने लहान मुलांसाठी लागणार्‍या औषधांचीही तयारी केल्याचे सांगत टोपे यांनी तिसर्‍या लाटेसाठी सर्व बाजूंनी आपण तयार असल्याचेही सांगितले. तसेच लोकांनी कोरोना नियमांचे पालन करावे आणि लसीकरणाला प्रतिसाद द्यावा, असे आवाहनही टोपे यांनी केले.

निर्बंध शिथिल होणारे जिल्हे

मराठवाडा: परभणी, लातूर, जालना, नांदेड, हिंगोली, औरंगाबाद आणि उस्मानाबाद.

विदर्भ: अमरावती, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, बुलढाणा, भंडारा. यवतमाळ, वर्धा, वाशीम आणि हिंगोली.

कोकण: रायगड, ठाणे आणि मुंबई

उत्तर महाराष्ट्र: जळगांव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -