Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे लवकरच पुनर्गठन, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे लवकरच पुनर्गठन, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

Related Story

- Advertisement -

जुलै महिन्यातील अचानक आलेल्या पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा शेतकऱ्यांची खरीप हंगामातील पिकांसाठी काढलेली पीक कर्जाचे पुनर्गठन करण्याबाबत रिझर्व्ह बँकेशी याबाबत चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी दिले. राज्यात अतिवृष्टीमुळे फटका बसलेल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना २०१९ च्या निकषाप्रमाणे मदत देण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. त्यांची अमंलबजावणी तसेच केंद्र शासनाकडून पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या एनडीआरएफच्या मदत निकषात वाढ करण्यात यावी यासाठी विविध पातळ्यांवरून पाठपुरावा सुरू आहे, अशी माहितीही ठाकरे यांनी दिली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळासमवेत आज ठाकरे यांची बैठक झाली. या बैठकीत बोलताना मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त शेतकरी, बाधितांना पुन्हा उभे करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील अशी ग्वाहीही दिली. याशिवाय पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये. त्याबाबत कायमस्वरुपी उपाययोजना करण्याबाबतही तज्ज्ञांशी आणि यंत्रणांशी समन्वय साधण्यात येत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

- Advertisement -

बैठकीत पश्चिम महाराष्ट्रात जुलै महिन्यात निर्माण झालेली पूरस्थिती, पूरबाधींतांना नुकसान भरपाई आणि त्यांचे पुनर्वसन याबाबत राजू शेट्टी तसेच खासदार धैर्यशील माने यांनी मांडणी केली. त्यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले, सन २०१९ या वर्षी शासनाने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीपेक्षा वाढीव दराने जी मदत केली आहे. त्याच धर्तीवर आताही मदत करण्यात येईल. जुलै महिन्याच्या सुरुवातीला राज्यात पडलेला अचानक पाऊस यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यात कोरोनाच्या संकटाबरोबरच नैसर्गिक आपत्तीमध्ये वाढ होत आहे. जुलै महिन्यात कमी कालावधीत मोठ्या प्रमाणात पडलेला पाऊस त्याचबरोबर मराठवाडा, खान्देश आणि विदर्भ या परिसरातही मोठया प्रमाणात पाऊस पडत आहे त्यामुळे नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. वेळोवेळी येणा-या आपत्तीत लोकांचे होणारे नुकसान पाहून आपतग्रस्तांना देण्यात येणारी तात्काळ मदत शासनाने एनडीआरएफच्या निकषापेक्षा अधिकची मदत दिली आहे.

पूरकालावधीत वाढणारे बॅक वॉटर यामुळे निर्माण होणा-या पूर परिस्थितीबाबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कर्नाटक, तसेच आंध्रप्रदेश बरोबर देखील याबाबतीत संवाद समन्वय साधला आहे. धरणातील बॅक वॉटर बाबत योग्य ती खबरदारी घेण्याच्या उपाययोजना सुरू आहेत. पूरबाधीत क्षेत्रातील लोकांचे योग्यरित्या पुनर्वसन व्हावे यासाठी प्रयत्न आहेत. या पुनर्वसन धोरणांबाबत सहकार्य करावे असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

- Advertisement -

बैठकीला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, खासदार अनिल देसाई, खासदार धैर्यशील माने, मुख्य सचिव सीताराम कुंटे आदी उपस्थित होते.


हेही वाचा – गर्दी करणारे राजकीय, धार्मिक कार्यक्रम नकोच; मुख्यमंत्र्यांचे राजकीय पक्ष, संघटनांना आवाहन


- Advertisement -