कोकण विभाग अव्वल, मुलीच सरस

विद्यार्थीनींच्या निकालाची टक्केवारी ही विद्यार्थ्यांपेक्षा 2.06 टक्क्यांनी जास्त आहे. 2020च्या निकालाच्या तुलनेत यंदाच्या निकालामध्ये 3.56 टक्क्यांनी वाढ झाल्याची पाहायला मिळत आहे. 2020मध्ये 90.66 टक्के इतका निकाल लागला होता.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) निकाल सकाळी 11 वाजता जाहीर करण्यात आला. राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांचा एकत्रित निकाल 94.22 टक्के इतका लागला आहे. 2020च्या तुलनेत यंदा निकालामध्ये 3.56 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यंदाही बारावीच्या निकालामध्ये मुलींनी बाजी मारली असून मुलींचा निकाल 95.35 टक्क,े तर मुलांचा निकाल 93.29 टक्के लागला आहे. त्याचप्रमाणे यंदाही कोकण विभागाने आपला अव्वल क्रमांक कायम ठेवण्यात यश मिळवले आहे, मात्र मुंबई विभागाची अखेरच्या क्रमांकावर घसरण झाली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य मंडळाने बारावीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेतली होती. त्यानुसार नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम या शाखांतील एकूण 14 लाख 49 हजार 664 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14 लाख 39 हजार 731 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांमध्ये 7 लाख 86 हजार 455 मुले, तर 6 लाख 53 हजार 276 मुलींचा समावेश होता. राज्यातून 13 लाख 56 हजार 604 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये मुलांची संख्या 7 लाख 33 हजार 699, तर मुलींची संख्या 6 लाख 22 हजार 905 इतकी आहे.

मुलांचा निकाल 93.29 टक्के, तर मुलींचा निकाल 95.35 टक्के इतका लागला आहे. यातून पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थीनींच्या निकालाची टक्केवारी ही विद्यार्थ्यांपेक्षा 2.06 टक्क्यांनी जास्त आहे. 2020च्या निकालाच्या तुलनेत यंदाच्या निकालामध्ये 3.56 टक्क्यांनी वाढ झाल्याची पाहायला मिळत आहे. 2020 मध्ये 90.66 टक्के इतका निकाल लागला होता. गतवर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मूल्यमापनाच्या आधारे परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे निकालामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. तसेच 24 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे.

कोकण विभागाने यंदाही आपली अव्वल क्रमांकाची घोडदौड कायम ठेवली आहे. कोकण विभागाने 97.21 टक्क्यांनी बाजी मारली आहे. कोकणातून 29 हजार 414 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील 28 हजार 595 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्याखालोखाल नागपूर (96.52), अमरावती (96.34), लातूर (95.25), कोल्हापूर (95.07), नाशिक (95.03), औरंगाबाद (94.97), पुणे (93.61) आणि मुंबई (90.91) इतका निकाल लागला आहे.

गुण पडताळणी आणि छायाप्रतीसाठी अर्ज करा
गुण पडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून (http://verification.mh-hsc.ac.in) स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी आवश्यक अटी-शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आल्या आहेत. गुण पडताळणीसाठी १० ते २० जूनपर्यंत व छायाप्रतीसाठी १० ते २९ जूनपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल.