घरमहाराष्ट्रपर्यटनाला उन्हाच्या झळा !

पर्यटनाला उन्हाच्या झळा !

Subscribe

 सुविधांचाही अभाव, पर्यटकांची संख्या रोडावली

रायगड जिल्ह्यातील समुद्र किनारे, गडकिल्ले नेहमीच पर्यटकांनी फुललेले असतात. त्यात शनिवार, रविवार किंवा सुट्टीचे दिवस असतील तर पर्यटकांची तोबा गर्दी उसळलेली असते. परंतु रस्त्यांची झालेली दुर्दशा, पर्यटनस्थळी असलेली सोयीसुविधांची वानवा आणि आता निवडणुका त्यातच वाढता उन्हाळा यामुळे या व्यवसायावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.शाळा, महाविद्यालयांना उन्हाळी सुट्टी लागली की मुंबईसह देशभरातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना भेटी देतात. यावर्षी अजून पर्यटन व्यवसायाला नेहमीप्रमाणे सुरुवात झालेली नाही. लोकसभेची निवडणूक आणि तापमानाचा वाढलेला पारा याचाही परिणाम या व्यवसायावर होत असल्याचे बोलले जात आहे. नागाव, किहीम, मांडवा, आवास, अलिबाग, रेवदंडा, काशीद, मुरुड, दिवेआगर, श्रीवर्धन, हरिहरेश्वर आदी समुद्रकिनारे व रायगड, कोर्लई, जंजिरा, कुलाबा आदी गडकिल्ले व पाली, नांदगाव, भवाळे, बिर्ला मंदिर (साळाव), चौल, दक्षिण काशी हरिहरेश्वर आदी मंदिरांनासुध्दा पर्यटक भेटी देतात. वास्तविक उन्हाळ्याचा झळा कमी करण्यासाठी पर्यटकांकडून समुद्र किनार्‍यांना अधिक पसंती दिली जाते.

विस्तीर्ण समुद्र किनारे देश, विदेशातून येणार्‍या पर्यटाकांना खुणावत असले तरी त्यांच्यासाठी आवश्यक असलेले चेंजिंग रूम, प्रसाधनगृह, किनार्‍यावर प्रकाश योजना, वाहनतळ, वॉटर स्पोर्टस्, सुरक्षिततेची साधने, गार्डन आदी सोयीसुविधा उपलब्ध होणे, तसेच वाजवी दरात वस्तू उपलब्ध होणे गरजेचे असल्याचे मत मुंबई येथून आलेले ज्ञानेश्वर मोरे यांनी मांडले.समुद्र सफर, आकाश सफर, किनारा रपेट, मऊशार वाळूत खेळणे, घोडेस्वारी, केतकीचे बन व सुरूंच्या बनातील सफारी आदी अनेक प्रकार काही समुद्र किनार्‍यांवर अनुभवास मिळत आहेत. परंतु शासनाने सर्वच पर्यटन स्थळांवर सोयीसुविधांचा विकास करणे आवश्यक आहे. राजकारणी व नेत्यांनी फक्त निवडणुकीपुरताच पर्यटन विकासाचा मुद्दा न ठेवता प्रत्यक्षात काम करणे आवश्यक असल्याची भावना पर्यटकांनी बोलून दाखविली आहे.

- Advertisement -

रायगड जिल्ह्यातील अनेक कुटुंबांचे आर्थिक बजेट हे पर्यटन व्यवसायावर चालते. अनेक कुटुंब या व्यवसायावर अवलंबून आहेत. यात हॉटेल, दुकानदार, कॉटेज मालक, रिक्षा, फेरीवाले, मजूर, कारागीर, भंगारविक्रेते, लहान-मोठे व्यापारी, खानावळी, मासळी विक्रेत्यांसह अनेकांचे संसार याच व्यवसायावर चालत आहेत. मुंबई, पुणे येथून सर्वाधिक पर्यटक जिल्ह्यात दरवर्षी येतात.यावर्षी अद्याप म्हणावा तसा पर्यटन व्यवसाय सुरू झालेला नसल्यामुळे अनेक पर्यटक व्यावसायिकांना चिंता वाटत आहे. देशात विविध टप्प्यात असलेल्या लोकसभेच्या निवडणुका व उष्णतेचा वाढता पारा, लग्नसराई, रस्त्याची सुरू असलेली कामे यासारखे अनेक अडथळे यावर्षी पर्यटन व्यवसायात आले असल्याचे पर्यटन व्यावसायिक सौरभ म्हात्रे (थळ) यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -