मुंबई : सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्ष महाविकास आघाडी यांच्यातील निकराच्या राजकीय लढाईत कोण बाजी मारणार याचा फैसला आज, शनिवारी (23 नोव्हेंबर) होणार आहे. राज्यातील 288 मतमोजणी केंद्रांवर एकाचवेळी मतांची मोजणी सुरू होईल. या मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाची यंत्रणा सज्ज झाली आहे. मतमोजणी होऊन निकाल जाहीर केले जाणार असल्याने आज दुपारपर्यंत नव्या सरकार स्थापनेबाबतचे चित्र स्पष्ट होणार असल्याने राजकीय घाडामोडीना वेग आला आहे. (Results of 288 constituencies in Maharashtra Assembly elections today)
पंधराव्या विधानसभा निवडणुकीसाठी 288 मतदारसंघात 20 नोव्हेंबरला राज्यात एकाच टप्प्यात मतदान झाले. तब्बल 30 वर्षानंतर राज्यात विधानसभेसाठी सर्वाधिक म्हणजे 66 टक्के मतदान झाले आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी पाच टक्के मतदान जास्त झाले आहे. या जादा मतदानाचा फायदा नेमका कुणाला होणार याविषयी उत्सुकता आहे. जादा मतदान आपल्याच पारड्यात झाल्याचा दावा महायुती आणि महाविकास आघाडीने केला आहे. विविध संस्थांनी जाहीर केलेल्या मतदानोत्तर चाचण्यांच्या निष्कर्षांतील गोंधळामुळे निकालाविषयी अनिश्चितता आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी निकालानंतर निर्माण होणाऱ्या संभाव्य परिस्थितीनुसार आपले प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी तयार ठेवले आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीची प्रक्रिया आज सकाळी सहा साडे आठ वाजल्यापासून सुरू होईल. निवडणूक आयोगाचे निरीक्षक, उमेदवार किंवा त्याचे प्रतिनिधी यांच्या समक्ष सीलबंद स्ट्रॉंग रूम उघडण्यात येतील. तेथून पोस्टल मतपत्रिका आणि मतदान मतमोजणी केंद्रांवर आणले जाईल. या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडीओ शूटिंग केले जाणार आहे. सकाळी आठ वाजता पोस्टाने प्राप्त झालेल्या मतपत्रिकांची मतमोजणी केली जाईल. त्यानंतर सकाळी साडेआठ वाजता मतदान यंत्रातील मतांची मोजणी सुरू होईल.
हेही वाचा – Sharad Pawar : एक्झिट पोल सोडा, शरद पवारांनी सांगितला मविआला मिळणाऱ्या जागांचा आकडा
मतमोजणीच्या प्रक्रियेसाठी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने मतमोजणीसाठी निरीक्षक नेमले आहेत. त्यामुळे त्यांच्या निरीक्षणाखाली 288 विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची मतमोजणी होईल, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी शुक्रवारी दिली. याशिवाय नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी दोन निरीक्षकांच्या उपस्थितीत मतमोजणी हाती घेण्यात येणार असल्याचे चोक्कलिंगम यांनी सांगितले.
विधानसभा मतमोजणीची प्रक्रिया पारदर्शी असणार आहे. त्यामुळे उमेदवारांचे प्रतिनिधी 17 सी फॉर्मच्या आधारे मतदान यंत्रातील मतांची पडताळणी करू शकतात. जवळपास 6 हजार 500 टेबल्सवर मतमोजणीच्या फेऱ्या पार पडणार आहेत. सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये टपाल मतपत्रिकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे 288 मतमोजणी केंद्रांवर 1 हजार 732 टेबल्स टपाल मतपत्रिकांच्या मतमोजणीसाठी आणि 592 टेबल्स इटीपीबीएमएस स्कॅनिंगसाठी (पूर्व-मोजणीसाठी) उभारण्यात आले आहेत, असे चोक्कलिंगम यांनी सांगितले.
हेही वाचा – Election 2024 : निकालाआधीच राष्ट्रपती राजवटीची चर्चा; घटनातज्ज्ञ डॉ. उल्हास बापट म्हणतात…
राजकीय पक्षांच्या योजना तयार
दरम्यान, विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडीना वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज संध्याकाळी उशीरा नंदनवन या सरकारी निवासस्थानी आपल्या आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी मतदानाचा आढावा घेतला. निकालानंतर आमदारांच्या संख्याबळाच्या आधारे पुढील रणनीती निश्चित केली जाईल, असे शिंदे यांनी आमदारांना सांगितल्याचे समजते. तसेच गरज पडल्यास कोणते अपक्ष आमदार आणि छोटे पक्ष आपल्यासोबत येऊ शकतात, याचे सूतोवाचही त्यांनी केल्याचे सांगण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पक्षातील तसेच अन्य नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन चर्चा केली. तर काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी आज मुंबईत दाखल घेत नेत्यांशी चर्चा केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार हे गुरुवारीच मुंबईतील आपल्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. त्यांनी गुरुवारी रात्री उशीरा काँग्रेस नेत्यांशी चर्चा केली.
आमदारांना हैद्राबाद, बंगळुरूला हलविण्याची काँग्रेसची योजना
काँग्रेसने निवडणूक निकाल घोषित झाल्यानंतर आपल्या आमदारांना उद्या, रविवारी मुंबईत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी नागपूर, कोल्हापूर आणि शिर्डीत विशेष विमानांची व्यवस्था करण्यात आली आहे. महाविकास आघाडीला बहुमतापर्यंत पोहचता आले नाही आणि विधानसभेचे चित्र त्रिशंकू आल्यास आमदारांना काँग्रेशासित तेलंगणा किंवा कर्नाटकात हलविण्याची तयारी काँग्रेसने केली आहे. या काँग्रेस आमदारांसाठी हैद्राबाद किंवा बंगळुरू येथील हॉटेलमध्ये ठेवले जाणार आहे.
तीन निरीक्षकांची नियुक्ती
दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि कर्नाटकातील नेते डॉ. जी. परमेश्वरा या यांची निरीक्षक म्हणून नेमणूक केली आहे. हे निरीक्षक निवडणूक निकालांवर लक्ष ठेवून राहणार आहेत.
मुंबई शहर जिल्ह्यातील मतमोजणी केंद्र
- किचन हॉल, तळमजला, भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रिडा संकुल, धारावी बस डेपो जवळ, सायन वांद्रे लिंक रोड, धारावी, मुंबई
- न्यू सायन म्यूनिसिपल स्कूल, प्लॉट नं. 160/161 स्कीम 6 रोड नं. 28, लॉयन ताराचंद बाप्पा हॉस्पिटलजवळ सायन (प), मुंबई
- महानगरपालिका न्यू बिल्डींग, सी. एस नं. 355- बी, स्वामी वाल्मिकी चौक, हनुमान मंदिर समोर, विद्यालंकार मार्ग, अॅन्टॉप हिल, मुंबई
- एमराल्ड हॉल, डॉ. अँथोनिया, डी. सिल्वा माध्यमिक शाळा, दादर मुंबई
- वेस्टर्न रेल्वे जिमखाना हॉल, सेनापती बापट मार्ग, महालक्ष्मी स्पोर्टस ग्राऊंड वरळी
- एन. एम. जोशी रोड महापालिका प्राथमिक शाळा नं 2, लोअर परेल मोनोरेल स्टेशन जवळ एन. एम. जोशी मार्ग, करी रोड, मुंबई
- रिचर्डसन्स ॲन्ड क्रुडास कंपनी लिमिटेड, तळमजला हॉल, सर जे.जे. रोड, हुमे माध्यमिक शाळेजवळ भायखळा मुंबई
- विल्सन कॉलेज तळमजला,रुम नं 102 व रुम नं 104, नेताजी सुभाषचंद्र रोड, गिरगाव चौपाटी, चर्नी रोड, मुंबई
- तळ मजला गिल्डर लेन महानगर पालिका शाळा, मुंबई सेंट्रल स्टेशनसमोर, मुंबई सेंट्रल पुर्व, मुंबई
- न्यु अपलाईड आर्ट असेंबली हॉल (एक्झिबिशन हॉल) सर जे. जे. स्कूल ऑफ अपलाईड आर्ट, डॉ. डी. एन. रोड फोर्ट, मुंबई
हेही वाचा – Maharashtra Election 2024 : पराभव दिसत असल्याने रडीचा डाव; दरेकरांची ठाकरेंवर टीका