इगतपुरीत रेव्ह पार्टी : अभिनेत्री हिना पांचालसह २५ जणांना पोलीस कोठडी

इगतपुरीत रंगलेल्या रेव्ह पार्टीप्रकरणी न्यायालयाने बिग बॉस फेम अभिनेत्री हिना पांचाल हिच्यासह ११ महिला आणि सहा पुरुषांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. तर चार पुरुषांना नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे सोमवार(दि.२८)ची रात्र या स्टार्सना तुरुंगातच घालवावी लागणार आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये अभिनेत्री हिना पांचाल हिचे नाव पुढे आल्याने अवघ्या बॉलीवूडसह रसिकांचेदेखील या प्रकरणाने लक्ष वेधले होते. या निमित्ताने पर्यटकांसाठी आकर्षण असलेले इगतपुरी रेव्ह पार्ट्यांमुळे बदनाम होऊ लागले आहे.

इगतपुरीत सुरु असलेल्या रेव्ह पार्टीवर रविवारी (दि.२७) मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्यासह नाशिक ग्रामीण पोलिसांनी छापा टाकला. छाप्यात सिनेसृष्टीतील कलाकारांना अटक केल्याने पुन्हा सिनेसृष्टी वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. पोलिसांनी बिग बॉसमध्ये सहभागी झालेल्या हिना पांचाल हिच्यासह एक विदेशी महिला, मराठी आणि दक्षिणात्य चित्रपट क्षेत्रात काम करणार्‍या पाच अभिनेत्री, दोन कोरियोग्राफर महिलांसह २२ जणांना बिभत्स अवस्थेत ताब्यात घेतले. पोलिसांनी कॅमेरा, ट्रायपॉड, कोकेन ड्रग्ज, हुक्कासह अमली पदार्थ व रोकड जप्त केली. त्यानंतर सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. रक्ताचे नमुने तपासणीसाठी संकलित करण्यात आले आहेत. सोमवारी न्यायालयाने २२ लोकांना पोलीस कोठडी सुनावली.