कोथरूडमधील बेपत्ता मुलाचा मित्रानेच खून केल्याचे उघड

खेळण्याच्या वादातून खून केल्याची अल्पवयीन आरोपीची कबुली

Revealed that a friend killed a missing boy in Kothrud at pune
कोथरूडमधील बेपत्ता मुलाचा मित्रानेच खून केल्याचे उघड

पुण्यातील कोथरूड परिसरात दोन दिवसांपूर्वी एका तेरा वर्षीय मुलाचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणी कोथरूड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करण्यात पोलिसांना यश आले आहे. खेळण्याच्या वादातून मित्रानेच हा खून केल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात स्पष्ट झाले. या प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले असून त्याने खुनाची कबुली दिली.

विश्वजीत वंजारी (वय 13) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. कोथरूडमधील केळेवाडी परिसरात तो राहत होता. २९ जानेवारीपासून तो बेपत्ता होता. याप्रकऱणी त्याच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून कोथरूड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, विश्वजीतचा शोध घेत असताना रविवारी दुपारच्या सुमारास पौड रस्त्याशेजारी असणाऱ्या एका निर्जन ठिकाणी पोलिसांना त्याचा मृतदेह सापडला होता. दरम्यान, पोलिसांनी संशयावरून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले होते. त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्यानेच विश्वजीतचा खून केल्याची कबुली दिली.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, मृत विश्वजीत आणि आरोपी दोघेही एकमेकांचे चांगले मित्र होते. ते रोज एकत्र खेळत असत. घटना घडण्याच्या दिवशीही ते एकत्रच लपंडाव खेळत होते. खेळत असताना सारखेसारखे आपल्यावरच राज्य येते याचा विश्वजीतच्या त्या मित्राला राग आल्याने त्याने विश्वजितला ढकलून दिले होते. यात डोक्याला जबर दुखापत झाल्याने विश्वजित निपचित पडला. त्यानंतर घाबरलेल्या आरोपीने पुन्हा त्याच्या डोक्यात दगडाने वार केले आणि त्याचा खून केला. याप्रकरणी अधिक तपास पोलिस करत आहेत.


हेही वाचा – हिंदू समाजाविषयी अपमानजनक वक्तव्य करणाऱ्या उस्मानी विरोधात गुन्हा दाखल